पत्रकार बांधवांना आपण देत असलेली न्यूज लक्ष वेधून घेणारी असावी, असे वाटत असते. ही बातमी कॅची करण्यासाठी अद्भुत प्रकारचे शीर्षक वापरले जातात. आजकाल वर्तमानपत्रांमध्ये ‘दिलासा’ आणि ‘तडाखा’ हे दोन शब्द नेहमी वापरात आहेत. दिलासा हा शब्द सहसा न्यायालयाने स्थगिती दिल्यास किंवा थेट कारवाई करण्याचे टाळल्यास संबंधित व्यक्तीला दिलासा मिळाला असे म्हटले जाते. एखादी बेधडक कारवाई पोलिसांनी केली, तर गुन्हेगारांना तडाखा दिला असे म्हटले जाते. दिलासे काही एवढेच नसतात. एकाच घटनेमुळे एका समूहाला दिलासा मिळत असतो आणि त्याच वेळी दुसर्या कोणत्यातरी समूहाला तडाखा बसत असतो.
आता परभणी रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची बातमी आहे. त्यामुळे उलटे झाले आहे. चोरट्यांना दिलासा मिळाला आहे आणि रेल्वे प्रवाशांना दररोज तडाखा बसत आहे. साहजिकच आहे. सीसीटीव्हीमुळे चोर्यांवर आळा बसला आहे. जागोजागी सीसीटीव्ही असतात. चोर आले कोणत्या मार्गाने, चोरी केली कशी किंवा ते दिसण्यास कसे होते, हे सर्व सीसीटीव्हीमध्ये टिपले जाते आणि त्यावरून पोलीस माग काढत असतात.
धावपळीत आणि गर्दीत रेल्वे गाठणारी जनता हे चोरट्यांचे हमखास लक्ष्य असते. चोरी करण्यापूर्वी चोर रेकी करतात, पाळत ठेवतात. सीसीटीव्ही आहेत का, याची माहिती बहुधा चोर आधी घेत असावेत. रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही बंद असल्यामुळे चोरांची चांगली सोय झाल्यामुळे त्यांना परभणीत दिलासा मिळाला, असे म्हटले जात आहे. चोरांचा उच्छाद असल्यामुळे आणि आपल्या वस्तू आणि रकमा चोरी होत असल्यामुळे प्रवाशांना तडाखा बसत आहे.
घटना एकच; परंतु परिणाम वेगवेगळे असतात, हे यावरून दिसून येते. एखाद्या व्यक्तीला अटक होणार असेल, तर ती व्यक्ती अटकपूर्व जामिनासाठी कोर्टामध्ये अर्ज करते. रितसर सुनावणी होऊन कोर्टाने असा जामीन मंजूर केला, तर सदर व्यक्तीला अटकेपासून दिलासा मिळाला, असे म्हटले जाते. आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात दिलासा देणार्या अनेक घटना घडत असतात. तेल, तांदूळ, साखर स्वस्त झाली की, आपण महिन्याच्या खर्चात दिलासा मिळाला असे म्हणतो. कधी कोणा वस्तूचे भाव वाढले, तर ग्राहकांना तडाखा पण बसतो. एकंदरीत पाहिले, तर आयुष्य हे दिलासे आणि तडाखे यांनी बहरलेले असते, हे निश्चित!