Dr. Shivram Baburao Bhoje  (Pudhari File Photo)
संपादकीय

Dr. Shivram Baburao Bhoje | दूरदर्शी आणि समर्पित विज्ञानयात्री!

भारतीय अणुऊर्जा क्षेत्रातील दूरदर्शी शास्त्रज्ञ म्हणून डॉ. शिवराम बाबुराव भोजे यांची ओळख होती.

पुढारी वृत्तसेवा

भारतीय अणुऊर्जा क्षेत्रातील दूरदर्शी शास्त्रज्ञ म्हणून डॉ. शिवराम बाबुराव भोजे यांची ओळख होती. अणुऊर्जा अभियांत्रिकीच्या प्रगतीत त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. विशेषत: फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर तंत्रज्ञानाची भारतात उभारण्यात भूमिका निर्णायक ठरली. कल्पक्कम येथे उभारलेल्या फास्ट ब्रीडर टेस्ट रिअ‍ॅक्टरच्या (एफबीटीआर) रचना, बांधकाम आणि संचालनात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या प्रयत्नामुळे भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम दीर्घकाळ टिकून राहण्यास भक्कम पाया लाभला.

प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

डॉ. शिवराम भोजे यांनी जगाचा निरोप घेतला आणि अणुऊर्जेसह पदार्थ विज्ञानाच्या क्षेत्रातील एक प्रगाढ बुद्धिवंत आपल्यातून निघून गेला. आज भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात जी उत्तुंग भरारी घेतली आहे, त्यामध्ये देशातील अनेक बुद्धिवान, प्रतिभावंत वैज्ञानिकांचे अमूल्य योगदान आहे. डॉ. भोजे हे त्यापैकी एक दूरदर्शी वैज्ञानिक होत. कागल तालुक्यातील कसबा सांगाव या गावातील एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या अवलियाने अणुऊर्जेसारख्या क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या विषयामध्ये केवळ प्रावीण्यच मिळवले नाही, तर फास्ट ब्रिडर रिअ‍ॅक्टर टेक्नॉलॉजीचे शिल्पकार म्हणून नाव इतिहासात नोंदवले. अणुभट्टी प्रकल्पांची रचना, आखणी आणि उभारणी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी बौद्धिक सामर्थ्याने भारताच्या अणुशक्ती मोहिमेस मोलाचे योगदान दिले.

‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दोन उप्रकमांवर गेले दशकभर भारत ‘विकसित देश’ बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे; परंतु डॉ. भोजे यांनी अणुतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर टेक्नॉलॉजीच्या रूपाने एक मोठी स्वदेशी उपलब्धी भारताला मिळवून दिली. या तंत्रज्ञानाचे ते शिल्पकार होते. त्यांच्या कार्यामुळेच आज भारत पीएफबीआर आणि थोरीयमवर आधारित अणुभट्टीच्या दिशेने वाटचाल करत आहे. कल्पक्कम येथील फास्ट ब्रीडर टेस्ट रिअ‍ॅक्टर (एफबीटीआर) हा प्रकल्प भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रासाठी क्रांतिकारी ठरला. कारण, यामुळे भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबन प्राप्त होण्यास दिशा मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रामध्ये (आयजीसीएआर) प्रकल्पाचे यशस्वी संचालन झाले आणि प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर (पीएफबीआर) हा 500 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प अंमलात आणला गेला. या रिअ‍ॅक्टरच्या विशेष रचना आणि कार्यपद्धतीशी संबंधित अनेक गुंतागुंतीच्या अभियांत्रिकी समस्यांचे निराकरण करण्यामागे डॉ. भोजे यांचे मोलाचे योगदान होते. अणुभट्ट्यांची कार्यपद्धती, उष्णतेचे वहन, तसेच सुरक्षिततेची काटेकोर अंमलबजावणी याबाबतचे त्यांचे सखोल ज्ञान या प्रकल्पाच्या यशस्वी संचालनासाठी अत्यावश्यक ठरले.

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीनुसार डॉ. भोजे यांच्यातील विज्ञानवेडाची झलक बालपणापासूनच दिसून येत होती. शालेय जीवनातील गुण आणि अभ्यासाची आवड त्यांना विज्ञान क्षेत्राकडे वळवणारी ठरली. त्यांनी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून 1965 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्या वर्षीच त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रशिक्षण शाळेत प्रवेश घेतला आणि तिथे त्यांचे विज्ञान क्षेत्रातील कारकिर्दीचे बीजारोपण झाले. तेथे केलेल्या मूलभूत संशोधनामुळे त्यांनी एकामागून एक उच्च पदापर्यंत आलेख सतत उंचावत ठेवला. त्यांचे नेतृत्व गुण, संशोधक वृत्ती आणि सर्वांना पुढे घेऊन जाण्याची त्यांनी स्वीकारार्ह द़ृष्टी यामुळे ते सहकार्‍यांमध्ये कमालीचे लोकप्रिय होते.

डॉ. भोजे यांनी अणुऊर्जा क्षेत्रात केवळ तांत्रिक योगदान दिले नाही, तर त्यांनी सुरक्षितता, कार्यक्षमता आणि दीर्घकालीन वापर करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर जबाबदारी घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण वैज्ञानिक प्रशिक्षित झाले आणि त्यांनी भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात नवनवीन शोध लावले. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या विविध समित्यांमध्ये सहभाग घेतला, ज्यामुळे भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावले. त्यांनी अणुऊर्जा सुरक्षा, नियमन आणि संशोधन धोरणांमध्ये घेतलेले निर्णय अनेक देशांसाठी मार्गदर्शक ठरले.

अणुऊर्जेची क्षमता अफाट आहे; पण तिच्याविषयी आजही नागरिकांमध्ये गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी डॉ. भोजे यांनी मोलाचे कार्य केले. ते नेहमी सागंत असत की, अणुऊर्जा हजारो वर्षे पुरेल इतकी आहे. अणुऊर्जेने कोणताही गॅस निर्माण होत नसून ग्लोबल वॉर्मिंगला आळा बसू शकतो. अणुऊर्जा समजावून सांगितली, तरच तिला मान्यता मिळेल. सौरऊर्जा, पवनऊर्जेचा वापर भविष्यात वाढेल; परंतु ती केव्हाही मिळत नाही. त्यासाठी ती साठवून ठेवावी लागेल. जगभरातील 770 कोटी लोकांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी खूप मोठी ऊर्जा आवश्यक आहे. यासाठी अणुऊर्जा हा एक सक्षम पर्याय ठरू शकतो, असे त्यांचे मत होते.

अणुऊर्जेसंबंधीचे प्रबोधन आणि आकलन लोकांना होण्यासाठी त्यांनी 300 पेक्षा जास्त वैज्ञानिक लेख लिहून फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर तंत्रज्ञान, अणुऊर्जा सुरक्षा, रिअ‍ॅक्टर कार्यप्रणाली आणि इंधन व्यवस्थापन यासंबंधी सखोल माहिती दिली. डॉ. भोजे हे अत्यंत समर्पित, दूरदर्शी आणि वैज्ञानिक द़ृष्टिकोन असलेले व्यक्तिमत्त्व होते. 2003 मध्ये त्यांच्या उत्तुंग वैज्ञानिक कार्याची दखल घेत पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. याखेरीज होमी भाभा विज्ञान व तंत्रज्ञान पुरस्कार, तसेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी वैज्ञानिक उपलब्धी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कालातीत योगदानाचा गौरव केला. एक मराठी माणूस गुणवैशिष्ट्यांनी कोणत्याही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात किती सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो, याचे ते उत्तम उदाहरण होते. कोल्हापूरच्या मातीतील रांगडेपणा, मनमिळाऊ स्वभाव, चिकित्सक वृत्ती आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आग्रह यामुळे ते ज्या-ज्या क्षेत्रात जातील त्या-त्या क्षेत्रात त्यांनी अमीट ठसा उमटवला.

महर्षी कणाद यांच्यापासून डॉ. अब्दुल कलाम यांच्यापर्यंत भारतीय पदार्थ विज्ञानात अभूतपूर्व क्रांती घडून आली. या क्रांतीची मशागत करण्यात स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील एका पिढीने निष्ठेने समर्पण केले. अशा समर्पित अणुशास्त्रज्ञांमध्ये कोल्हापूरचा सिंहाचा वाटा आहे. डॉ. भोजे हे या परंपरेचे पाईक होते. आजही शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागातील प्राध्यापकांनीही अणुसंशोधनात मोलाची भर टाकली आहे. डॉ. भोजे यांनी या परंपरेचा भक्कम पाया घातला. पंचगंगेचे पाणी त्यांनी गंगा आणि यमुनेपर्यंत पोहोचवले. असा हा कोल्हापूरचा सुपुत्र भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभ बनून राहील. भारताच्या अणुशास्त्राच्या क्षितिजावर त्यांचे नाव एखाद्या तेजस्वी तार्‍यासारखे सदोदित झळकत राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT