ब्रिलियंट माईंड! (Pudhari File Photo)
संपादकीय

Brilliant Mind | ब्रिलियंट माईंड!

Brilliant Mind Meaning | तीक्ष्ण, जलद विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची अफाट क्षमता असणारे मन म्हणजे ब्रिलियंट माईंड.

पुढारी वृत्तसेवा

देविदास लांजेवार

ब्रिलियंट माईंड म्हणजे तल्लख मन. तीक्ष्ण, जलद विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची अफाट क्षमता असणारे मन म्हणजे ब्रिलियंट माईंड. अशा तल्लख मनाला गुंतागुंतीच्या समस्या सहजपणे सोडवणे आवडते. जगातील गूढ गोष्टींचे कुतूहल त्यांना असते आणि नवनव्या गोष्टींचा शोध लावण्याची जिज्ञासा त्यांच्या ठायी असते. असे ब्रिलियंट लोक सर्जनशील आणि कमालीचे कल्पक असतात. अशाच ब्रिलियंट चार भारतीय युवा वैज्ञानिकांनी जगात त्यांच्या अफाट कर्तृत्वाचा झेंडा फडकावला आहे. अंगद दरयाणी, अर्कित जसवाल, आकाश मनोज आणि रिफाथ शारूत हे ते चार जिनियस युवक होत.

अर्कित जसवाल हा पंजाबच्या नूरपूरचा. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्याने कमालच केली अन् तो वर्ल्ड यंगेस्ट सर्जन ठरला. आपल्या अचाट बुद्धिमत्तेच्या बळावर त्याने वयाच्या 12व्या वर्षी आयआयटीत प्रवेश मिळवला. 143 बुद्ध्यांक असलेला अर्कित सध्या आयआयटी कानपूरमध्ये बायोइंजिनिअर आहे. आकाश मनोजही तामिळनाडूचा असाच ब्रिलियंट बॉय. वयाच्या 18 व्या वर्षी मनोजने ‘सायलेंट हार्ट अटॅक’चा शोध लावून ‘नॅशनल चाईल्ड अ‍ॅवॉर्ड फॉर एक्सेप्शनल अचिव्हमेंट’ पुरस्कार जिंकला. या त्याच्या कर्तृत्वाचा यथोचित गौरव भारताच्या राष्ट्रपतींनी केला आहे.

तामिळनाडूतील पल्लापताई येथील 18 वर्षे वयाचा रिफाथ शारूत हा सर्वात कमी वयाचा शास्त्रज्ञ. तो आणि त्याच्या टिनेजर टीमने ‘नासा’साठी 64 ग्रॅम वजनाचा जगातील सर्वात छोटा आणि वजनाने हलका असलेला उपग्रह तयार केला. ‘कलामसॅट’ असे या उपग्रहाचे नाव. तो अंतराळातील किरणोत्सर्ग मोजण्याचे काम करतो. रिफाथ आता ‘स्पेस किडस् इंडिया’चा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहे.

सध्या मुंबई आयआयटीमध्ये वापरले जाणारे 3डी प्रिंटर भारताचा वंडर बॉय अंगद दरयाणी या मुलाने वयाच्या 13व्या वर्षी तयार केले आहे. अत्यंत कमी वयात म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी अंगदने सोलर पॉवरवर चालणार्‍या बोटचा शोध लावला आणि वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने अंधांच्या आयुष्यातील अंधार दूर केला. त्यांच्यासाठी त्याने ‘ई-रिडर’ नावाची डिजिटल प्रणाली विकसित केली. तो आता स्वत:ची डीआयवाय किट कंपनी चालवतो. हा झाला तल्लख बुद्धीच्या युवा वैज्ञानिकांचा चित्तथरारक प्रवास.

मनोरथाचा रथ रचनात्मक शक्तीच्या चाकांवाचून चालू शकत नाही. बुद्धी आणि मनाच्या रेशमी पडद्यावर अनेक चित्रविचित्र चित्रे आकार घेत असतात. पण, जोपर्यंत चित्रकार हातात कुंचला घेऊन मेहनत घेत नाही, तोपर्यंत अप्रतिम कलाकृती आकारास येत नाही. ज्यांना काही तरी करून दाखवायचे असते, प्रकाशायचे असते, फुलायचे असते आणि पुढे जायचे असते त्यांच्या मार्गात वय, परिस्थिती अडथळा निर्माण करू शकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT