बा विठ्ठला, तुझी कृपा आम्हावरी अशीच असू दे. बर्यापैकी वारी निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर वारकरी मंडळी गावाकडील प्रवासाला लागली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही परतवारी सुद्धा निर्विघ्न होऊ दे एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना. हालअपेष्टा यांची पर्वा न करता तुझ्या दर्शनाच्या ओढीने अक्षरशः लाखो वारकरी गावागावांतून पंढरीच्या दिशेने आले. कुणाला आजोबांनी नेम घालून दिला होता, तर कुणाला वडिलांनी, तर कुणाची पिढ्यान्पिढ्यांची प्रथा होती. ही प्रथा जपण्यासाठी गावोगावची मंडळी तुझ्या दर्शनार्थ पंढरीला आली आणि कळसाचे दर्शन घेऊन तृप्त होऊन परतीला लागली. हा परतीचा प्रवास पण सुखाचा होऊ दे रे बाबा. नुकतेच परतीच्या प्रवासात एका दाम्पत्याचे अपघाती निधन झाले. कुठे वाहनांना अपघात होतात आणि वारकरी दगावतात. काहीही करून हे तत्काळ थांबव रे विठ्ठला!
खरिपाची शेतीची कामे जेमतेम आटोपून मंडळी सुमारे वीस ते पंचवीस दिवस चालत तुझ्या दर्शनाला येतात. वारी जिथून जाते त्या देहू - आळंदी या परिसरात नित्यनेमाने पाऊस पडतो. परंतु तुझा भक्त समुदाय महाराष्ट्राच्या विविध भागांत विखुरलेला आहे. वारकरी वारीला आलेला असताना त्याच्या शेतात पाऊस पाडून त्याला सुखद धक्का दे रे पांडुरंगा. ज्यांनी पेरणी केली आहे ते वारी संपवून परत शेतामध्ये जातील तेव्हा त्यांची पिके किमान हातभर वर आलेली त्यांना दिसू दे, हीच तुझी कृपा असणार आहे. ‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ असा आपला मूलमंत्रच आहे. पिकविणारा गलितगात्र झाला तर लोकांना धान्य खाऊ कोण घालणार, हा एक मोठाच प्रश्न असतो. या बळीराजाला बळ देण्याचे काम करण्याची जबाबदारी तुझीच आहे रे विठ्ठला. तू तेवढी पूर्ण कर, एवढीच तुझ्या चरणी आमची विनंती आहे.
शेतामध्ये इतके भरघोस पीक येऊ दे आणि त्याचबरोबर शेतमालाला इतका भाव मिळू दे, जेणेकरून आमचा बळीराजा कर्जाच्या सापळ्यातून बाहेर येईल. त्याच्या गळ्याभोवती बसलेला कर्जाचा फास प्रत्यक्ष फासामध्ये कधी परावर्तित होईल हे सांगता येत नाही. यासाठी तूच त्याला शक्ती दे ही तुझ्या चरणी प्रार्थना. आमची सुख-दु:खं आम्ही सांगायची तरी कुणाला? तूच तारणहार आणि तूच आमचा त्राता आहेस, तारणहार आहेस. त्यामुळे तुझ्याच कृपेची विनंती आम्ही करू शकतो. कारण आमच्याकडे अन्य कुणीही कोणताही तरणोपाय नाही. बा विठ्ठला, आणखी एक कर. शेतकर्यांना वेळेवर बी-बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित लोकांना बुद्धी दे, जेणेकरून शेती करणे सुखावह होईल. निसर्गाच्या अस्मानीला तोंड देता देता शेतकरी थकला आहे. त्याला ऊर्जा देण्याचे काम तुलाच करावे लागणार आहे विठ्ठला.चंद्रभागेच्या तीरी उभे असलेले तुझे लोभसवाणे रूप डोळ्यात साठवून वर्षभराची बेगमी करत वारकरी आता गावी परतत आहे. भाजीमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेणारे संत सावता असोत की संत ज्ञानेश्वर वा जगद्गुरू तुकोबाराय असोत, यांनी आमच्यावर वारीचे मजबूत संस्कार केले आहेत.