reduction in insect population due to air pollution
Pudhari File Photo
संपादकीय

वायू प्रदूषणाच्या विळख्यात कीटक

पुढारी वृत्तसेवा

विनिता शाह

गेल्या काही वर्षांत पृथ्वीच्या वातावरणात बदल होत आहेत. त्यातील वायू प्रदूषण हे सर्वच स्तरातल्या सजीवांवर परिणाम करणारे आहे. हवेत मिसळणार्‍या विषारी वायूंचा वाईट परिणाम संपूर्ण जैवविविधतेवर होताना जाणवत आहे. जैवविविधतेच्या एका साखळीचा दुवा असलेल्या सूक्ष्म कीटकांवरही त्याचा परिणाम होत आहे. हे कीटक बहुतांश वेळा हवेत उडताना दिसतात. हे सूक्ष्म असले, तरीही जैवसाखळीतील त्यांची कामगिरी महत्त्वाची असते.

कचर्‍याच्या विघटनापासून ते परागभवनापर्यंत कीटकांचा फार महत्त्वाचा वाटा जैवसाखळीत असतो. मानवी आयुष्यात या कीटकांचे महत्त्व नाकारता येत नाही. कारण, ते मानवी जीवनाच्या प्रत्येक पायरीवर अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकताना दिसतात. मात्र, वातावरणावर ध्वनिप्रदूषणाच्या मोठ्या थरामुळे कीटकांच्या आयुष्यात उलथापालथ होत आहे. या कीटकांना अन्न मिळवण्यापासून ते नव्या पिढीची निर्मिती, त्यांचा विकास या सर्वच प्रक्रियांवर प्रदूषणामुळे केवळ परिणाम झाला, असे नव्हे तर त्या नष्टही झाल्या आहेत. कीटकांच्या माहिती प्रणालीवर धूर आणि वायूमुळे अडथळे आले. यामुळे त्यांचा मार्ग हरवला. कीटकांच्या बाबतीत नुकत्याच झालेल्या संशोधनातून कीटकांच्या घटत्या संख्येमागे प्रदूषणाबरोबरच शहरीकरण, कृषी क्षेत्रातला वाढता कीटकनाशकांचा वापर तसेच पर्यावरणीय बदलही कारणीभूत आहेत.

प्रदूषण केवळ शहराच्या जवळपास नव्हे, तर ग्रामीण भागातल्या कीटकांच्या संख्येवर परिणाम करताना दिसत आहे. धूर, धूळ, धुके तसेच पीएम कण हे कीटकांच्या श्रृंगिका किंवा मिश्या आणि इंद्रियांवर वाईट परिणाम करत असल्याचे लक्षात आले आहे. मेलबॉर्न युनिव्हर्सिटी, बीजिंग वानिकी विद्यापीठ आणि कॅलिफोर्नियातल्या संशोधकांच्या अभ्यासातून कीटकांवर होणार्‍या प्रदूषणाचा परिणाम अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक असल्याचे लक्षात आले आहे. जागतिक आरोग्य परिषदेकडून निर्धारित केलेल्या मानकांनुसार ते वार्षिक सरासरीपेक्षा जास्त आहे.

शेतात, बागांमध्ये उडणार्‍या या कीटकांचे मुख्य काम असते ते परागीभवनाचे. पीक, फुले यांचे परागीभवनामुळे होत असल्याने नव्या बियाणांचे, रोपांचे संवर्धन होते. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ने संकटग्रस्त प्रजातींचा समावेश असलेली एक लाल यादी जाहीर केली आहे. त्यात कीटकांच्या 8 टक्के प्रजातींचा समावेश आहे. दुसर्‍या एका अभ्यासानुसार, 1990 नंतर कीटकांच्या संख्येमध्ये सुमारे 25 टक्क्यांची घट झाली आहे, तसेच असाही अंदाज व्यक्त केला जातो आहे की, प्रत्येक कीटक एका दशकात सुमारे 9 टक्क्यांच्या दराने कमी होत आहे. संशोधकांच्या मते प्रदूषणामुळे कीटकांच्या श्रृंगिकांवर परिणाम होतो आणि मेंदूला पाठवल्या जाणार्‍या वासाशी निगडीत विद्युत संकेतांची क्षमता कमी होते. कीटकांच्या श्रृंगिकेमध्ये वास धरून ठेवणारी इंद्रिये असतात जी आहार, स्रोत, संभवित जोडीदार आणि अंडी घालण्यासाठी एक चांगली जागा शोधण्यात मदत करत असतात. अशा वेळी कीटकांच्या श्रृंगिका कणयुक्त पदार्थाने झाकल्या गेल्या असतील, तर एक शारीरिक विरोध उत्पन्न होतो. त्यामुळे वासाला धरून ठेवणारे इंद्रिय आणि हवेत असलेले वासाचे अणू यांच्यादरम्यान होणारा संपर्क रोखला जातो.

जीवाश्म इंधन जाळण्यातून निघणारे सूक्ष्म कण म्हणजेच पीएम कणांत विषारी धातू आणि कार्बनिक पदार्थांचा समावेश असतो. श्वासावाटे हे कण शरीरात जाऊ शकतात. कीटकांसाठी वायू प्रदूषण किती घातक ठरते, याविषयी बीजिंग आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्रामीण भागात झालेल्या संशोधनातीन सूक्ष्म कण मधमाश्या, पतंग आणि माश्यांसह विविध कीटकांच्या श्रृंगिकांवर जमा होतात. श्रृंगिकांवर जमा होणार्‍या प्रदूषक घटकांमुळे कीटकांची माहिती प्रणाली बंद होते. तसेच एकमेकांमध्ये संदेशवहन होऊ शकत नाही. अन्न मिळवणे, साथीदार शोधणे, निवारा शोधणे यासाठी आवश्यक शक्ती क्षीण होते. त्यांच्या श्रृंगिकेचे काम बंद होते आणि कीटक मृतवत होतो व त्याचा मृत्यूही वेळेपूर्वीच होतो आणि त्याच्या संदेशवहन प्रणालीत अडथळा निर्माण होतो.

SCROLL FOR NEXT