नुकत्याच अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर विमान प्रवास म्हटले की, उरात धडकी भरल्यासारखे होत आहे. कधीकाळी दूरवर आकाशात उडणारे विमान पाहिले की, कधीतरी त्यात आपण बसले पाहिजे, असे अनेकांचे स्वप्न असायचे. आज-काल आपल्या घरावरून किंवा बिल्डिंगवरून विमान जात असले, तरीही जीव घाबरा घुबरा होत आहे. त्यातच अशात बरीच विमाने अर्धवट प्रवास सोडून परत फिरली आहेत. काहींनी निघतानाच विश्राम अवस्थेमध्ये थांबा घेतलेला आहे. बरेचदा आभाळात फिरणारे पक्षीपण विमानांना अडथळे आणत असतात. नुकताच एका भटक्या कुत्र्याने पुणे विमानतळावर प्रवाशांचा जीव टांगणीवर टांगून ठेवला होता.
भटक्या कुत्र्यांचे अनेक उपद्रव माणसाला होत असतात. उदाहरणार्थ, भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे दरवर्षी हजारो लोक आपल्या देशात दगावतात. रात्रीच्या अंधारात एकट्या-दुकट्या व्यक्तीमागे धावत जाणे, एखादा सायकलवाला किंवा मोटरसायकलवाला आपल्याच तंद्रीत वाहन चालवत असेल, तर त्याचा पाठलाग करून त्याला खाली पाडणे असे प्रकार कुत्रे करत असतात. घडलेला प्रकार असा आहे की, एअर इंडियाच्या एका विमानाने दुपारी चार वाजता भुवनेश्वर येथून पुण्यासाठी उड्डाण केले. पुणे विमानतळाच्या आसपास आल्यानंतर वैमानिकाला धावपट्टीवर कुत्रा असल्याचे आढळून आले. त्यामुळे या विमानाला त्या परिसरातच हवेत घिरट्या माराव्या लागल्या.
दरम्यान, वैमानिकाने सर्व प्रवाशांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली आणि अजिबात काळजी करू नका, असा धीर दिला. कुणी कितीही धीर दिला, तरी ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ अशी माणसाची मनःस्थिती असते. पुणे विमानतळाच्या धावपट्टीवरून कुत्र्याला हटवेपर्यंत विमान हवेत होते. कुत्र्याला सुरक्षितपणे हटवल्यानंतरच विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर हे विमान सुरक्षित उतरले. यादरम्यान हे विमान विमानतळाच्या आसपास घिरट्या घालत असताना प्रवाशांची काय मनःस्थिती झालेली असेल, याचा विचारही करवत नाही. आधीच विमान सुरक्षित पोहोचेल की नाही, ही धास्ती. त्यात पुन्हा वैमानिकाने काही कारणामुळे विमान हवेतच अर्धा तास फिरवले तेव्हा निश्चित काय चालले असेल, याची कल्पनाच करवत नाही.
अशावेळी सामूहिक हनुमान चालिसा वगैरे पठण सुरू असते आणि प्रत्येक जण आपल्या देवाचा धावा करत असतो. विमान प्रवास हा असा एकंदरीत धाकधुकीचा झालेला आहे. काही दिवसांपूर्वी तर चक्क बिबट्याच धावपट्टीवर दिसला होता. याचा अर्थ सर्वच प्राणिमात्रांना विमानतळाच्या आसपास राहणे आवडते असे दिसून येत आहे. अलीकडच्या काळातील सर्व घडामोडींवर प्रकाश टाकला, तर बर्याचवेळा आपले मन सुन्न आणि उदास होत असते. सर्व काही धडकी भरवणारे असते. कधी काही घडेल, याची काही शाश्वती देता येत नाही.