Latest

कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांच्याविरोधात समरजितसिंह घाटगे यांचा भव्य मोर्चा

अनुराधा कोरवी

कागल; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीमध्ये श्री रामाचा एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज शुक्रवारी कागलमध्ये भव्य मोर्चा काढला.

मुश्रीफ यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी समरजितसिंह घाटगे समर्थकांसह दाखल झाले. यानंतर पोलिसांनी हा मोर्चा पोलिस आवारामध्ये अडविला आहे. तर मुश्रीफ यांनी ते स्टंटबाजी करत असल्याचा आरोप केला आहे.

रामनवमी हा आपला वाढदिवस आहे, हा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा संशोधनाचा विषय आहे. मात्र, यानिमित्ताने त्यांच्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांच्या नावातील अद्याक्षरे घेऊन राम असा बहुजन समाजाचे नायक प्रभू रामचंद्र यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी जाहीर केले होते. शुक्रवार, दि. 15 रोजी कागल येथे मिरवणूक काढून हा गुन्हा दाखल करण्यासाठी घाटगे हे कागल पोलिस स्थानकात गेले.

यासंदर्भात घाटगे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका करत याप्रकरणी मुश्रीफ हे माफी मागतील म्हणून दोन दिवस वाट पाहून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. दि. 10 एप्रिल रोजी अखंड भारताचे व बहुजन समाजाचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मदिवस आपण साजरा केला. पण या शुभदिवसाचा हसन मुश्रीफ यांनी अवमान केल्याचा आपल्याला प्रचंड राग व खंत आहे. यातच कागलचे नाव त्यांच्या आधी घेतल्याबद्दल आपण सर्वांची माफी मागतो, असेही घाटगे यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. 1954 साली रामनवमी दिवशी तिथीप्रमाणे आपला जन्म झाल्याचे मुश्रीफ म्हणतात. तो झाला की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. त्यांच्या स्वयंघोषित तिथीप्रमाणे रामनवमी निमित्ताने त्यांची दिलेली जाहिरात ही लाजीरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT