पुढारी ऑनलाईन डेस्क : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 च्या अंतिम सामन्यात इंडिया लिजेंड्सने श्रीलंका लीजेंड्सचा 33 धावांनी पराभव केला. सलामीवीर नमन ओझाने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याने 71 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 108 धावांची खेळी केली. सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नमन ओझाच्या शतकावर सचिन तेंडुलकरची (sachin tendulkar) 'गोल्डन' रिॲक़्शन टिपण्यात आली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत नमन ओझाने 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लाँग ऑन आणि मिड विकेटमध्ये षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. स्पर्धेतील पहिले शतक झळकावल्यानंतर ओझाने भारतीय ड्रेसिंग रुमकडे बॅट दाखवली आणि आनंद साजरा केली. यावेळी ड्रेसिंग रुममध्ये उपस्थित कर्णधार सचिन तेंडुलकरसह प्रत्येक खेळाडूने उभे राहून ओझाच्या या शतकाला सलाम केला. त्याचवेळी तेंडुलकरनेही त्याला शेवटपर्यंत खेळण्याचा सल्ला दिला.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर प्रथम फलंदाजी करताना नमन ओझाच्या शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर 196 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येसमोर दिलशानचा संपूर्ण संघ 162 धावांत गारद झाला. सामन्यादरम्यान तेंडुलकरने (sachin tendulkar) विनय कुमारला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवून मोठा मास्टर स्ट्रोक खेळला. सचिन गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर रैनाही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. 3 षटकांत दोन गडी बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या विनय कुमारने ओझासोबत 95 धावांची भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले. विनयने गोलंदाजीतही तीन बळी घेतले.