युक्रेनच्या किव भागातील सीमा चौकीची रशियाच्या हल्ल्यानंतर झालेली दुर्दशा 
Latest

रशिया-युक्रेन युद्ध! जगावर लादलेल्या युद्धाची काय आहेत कारणे?

Arun Patil

जगाने दोन महायुद्धांचे संकट झेललेलं आहे. त्यानंतरच्या काळातही जगभरात अनेक युद्धं होऊन गेली. सध्याच्या काळात जग कोरोना महामारीचाही सामना करीत आहे. अशावेळीच जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावरही उभे आहे. युक्रेनचे तीन तुकडे करून दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती केल्यानंतर आता रशियाने युक्रेनच्या (Russia-Ukraine war) भूमीवर प्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे. जगातील बडी राष्ट्रे या संघर्षात पडून जग पुन्हा एकदा महायुद्धाच्या खाईत लोटले जाईल की काय, अशी धाकधूक निर्माण झाली आहे. जगावर आलेल्या या नव्या संकटाची पार्श्वभूमी अशी…

रशियाच्या हल्ल्यात मध्य युक्रेनमधील विन्नीत्सिया लष्करी तळावर झालेला हा मोठा स्फोट. धुराचे असे अजस्त्र लोट आसमंतात उडाले

रशियाच्या शेजारीच असलेला युक्रेन हा पूर्व युरोपातील एक मोठा देश. आकाराने मोठा असला तरी गरिबी आणि भ्रष्टाचाराशी झुंजत असलेला हा एक विकसनशील देश आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी धमकीच दिली होती की जर 'नाटो'त समाविष्ट होण्यात युक्रेनला यश आले तर अणुयुद्धही होऊ शकते!

युक्रेनची राजधानी किवमध्ये गुरुवारी पहाटे रशियाच्या क्रूझ क्षेपणास्त्र व रॉकेटच्या हल्ल्यानंतरचे निर्माण झालेले आगीचे व धुराचे लोट

1. बड्या राष्ट्रांचे गुंतलेले हितसंबंध (Russia-Ukraine war)

बड्या राष्ट्रांचे विविध देशांमध्ये गुंतलेले हितसंबंध, कुरघोडीचे आंतरराष्ट्रीय राजकारण, बड्या राजकीय नेत्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा, आर्थिक लाभ, विस्तारवाद, वर्चस्ववाद अशा सर्व गोष्टींमधून हा गुंतागुंतीचा पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. पुतीन यांनी तर युक्रेनविरुद्ध संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनसारख्या धोकादायक राष्ट्रालाही जवळ केले आहे. इतकेच नव्हे तर तैवान हा चीनचाच एक भाग असल्याचे सांगून टाकून युक्रेनवरील संभाव्य हल्ल्यास चीनने समर्थन करावे अशी तजवीज करून ठेवली होती.

अर्थात सध्या तरी चीनने याबाबत तटस्थ भूमिका घेतलेली आहे. युक्रेनची सीमा पश्चिमेकडे युरोपियन देशांशी व पूर्वेकडे रशियाशी जोडलेली आहे. 1991 पर्यंत युक्रेन सोव्हिएत संघाचा एक भाग होता. मात्र, त्यावेळीही सोव्हिएत संघाच्या दडपशाहीविरुद्ध युक्रेनमध्ये सशस्त्र बंड होत होते. त्यामुळेच युक्रेनला शांत करण्यासाठी 1954 मध्ये सोव्हिएत संघाचे सर्वोच्च नेते निकिता ख्रुश्चेव्ह यांनी क्रिमिया हे तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले महाद्वीप युक्रेनला भेट म्हणून दिले होते.

सोव्हिएत संघाचे 1991 मध्ये विघटन होताच युक्रेनने स्वतःला स्वतंत्र घोषित केले. मात्र, युक्रेनमधील लोक व राजकीय नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झाली. एक गट रशियाचे समर्थन करणारा आहे तर दुसरा गट युरोपियन संघ व 'नाटो'चे समर्थन करणारा आहे.

युक्रेनच्या खार्किव्ह येथील चुहुव्ह लष्करी हवाई तळावरील हल्ल्यानंतरची स्थिती

2. युक्रेनमधील वाढता रशियाविरुद्धचा असंतोष (Russia-Ukraine war)

रशिया आणि युक्रेनमधील तणाव सुरू होण्यास 2013 मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी युक्रेनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच हे युरोपियन संघाबरोबर आर्थिक व राजनैतिक समझोत्यावर स्वाक्षरी करणार होते. मात्र, रशियाच्या दबावामुळे त्यांनी आपला निर्णय बदलला व त्यामुळे नोव्हेंबर 2013 मध्ये युक्रेनची राजधानी कीवमध्ये यानुकोविच यांच्याविरुद्ध प्रचंड निदर्शने सुरू झाली.

यानुकोविच यांना रशियाचा पाठिंबा होता तर त्यांच्याविरुद्ध निदर्शने करणार्‍या लोकांना ब्रिटन-अमेरिकेचा पाठिंबा होता. फेब्रुवारी 2014 मध्ये यानुकोविच यांना देश सोडून परागंदा व्हावे लागले. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बनलेल्या पेट्रो पोरोशेंको यांनी युरोपियन संघाबरोबर करार करून युक्रेनचा कल कोणत्या दिशेने आहे हे स्पष्टपणे दाखवून दिले.

त्यामुळे नाराज होऊन रशियाने दक्षिण युक्रेनच्या क्रिमियावर कब्जा केला. त्यावेळेपासूनच रशियन समर्थक फुटिरतावादी आणि युक्रेनची सेना यांच्यामध्ये लढाई सुरू होती. 1991 मध्ये रशियापासून युक्रेन वेगळा झाल्यानंतर क्रिमियासाठी दोन्ही देशांमध्ये वेळोवेळी तणातणी झालेली आहे. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये 'शांतता' निर्माण करण्यासाठी पाश्चिमात्य देश पुढे आले.

2015 मध्ये फ्रान्स आणि जर्मनीने बेलारुसची राजधानी मिन्स्कमध्ये रशिया-युक्रेनमध्ये शांती समझोताही घडवून आणला व संघर्षविराम करण्यात आला. मात्र, त्यावेळेपासून युक्रेनमध्ये रशियाबद्दल जी अढी निर्माण झाली त्याचा परिणाम असा झाला की युक्रेनचा कल सातत्याने युरोपियन देशांकडे वाढू लागला. अर्थातच ते रशियाच्या डोळ्यात खुपू लागले.

युक्रेनची राजधानी किवमध्ये गुरुवारी पहाटे रशियाच्या क्रूझ क्षेपणास्त्र व रॉकेटच्या हल्ल्यानंतरचे निर्माण झालेले आगीचे व धुराचे लोट

3. युक्रेनचा 'नाटो'मधील समावेशाचा कळीचा मुद्दा

'नाटो'चा सदस्य नसला तरी 'नाटो' देशांशी युक्रेनचे मधुर संबंध आहेत. मुळात 'नाटो'ची स्थापनाच आपल्या मुळावर येण्यासाठी झालेली आहे हे रशियाला ठाऊक आहे. सोव्हिएत संघाचा मुकाबला करण्यासाठीच 1949 मध्ये 'नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन' (नाटो) ची स्थापना करण्यात आली होती. अमेरिका आणि ब्रिटनसह जगभरातील 30 देश 'नाटो'चे सदस्य आहेत. त्यामधील 'ट्रीटी' म्हणजेच करारानुसार कोणत्याही सदस्य राष्ट्रावर जर अन्य देशाने आक्रमण केले तर सर्व सदस्य देश एकजुटीने त्याचा मुकाबला करतील.

रशियाची मागणी आहे की 'नाटो'ने युरोपमधील आपला विस्तार थांबवावा. युक्रेन रशियाला खेटूनच असल्याने जर हा देश 'नाटो'चा सदस्य बनला तर ते रशियाला महागात पडेल याची जाणीव रशियाला आहे. त्यामुळेच युक्रेनने 'नाटो' मध्ये समाविष्ट होऊ नये, यासाठी रशियाचा आटापिटा सुरू आहे. शिवाय युक्रेनमधील नैसर्गिक तेल व वायूच्या खाणींवर रशियाचा तसेच अमेरिकेचाही डोळा आहे.

'नाटो'ने रशियाविरुद्ध युक्रेनच्या भूमीचा वापर केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही पुतीन यांनी दिला होता. युक्रेनला रशियाची भीती असल्याने या देशाने 'नाटो'त सहभागी होऊन आपल्या मागे 'नाटो'च्या सदस्य राष्ट्रांची शक्ती उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

अर्थातच युक्रेन जर 'नाटो' सदस्य बनला आणि जर भविष्यात युक्रेनशी युद्धाचा प्रसंग आला तर 'नाटो'चे सदस्य त्यामध्ये पडून तिसरे महायुद्धही होऊ शकते, याची रशियाला जाणीव होती. सध्या ब्रिटन, कॅनडा, अमेरिका यासारख्या अनेक देशांनी युक्रेनला मदतही पाठवलेली आहे. त्यामुळे जग पुन्हा एकदा महायुद्धाच्या खाईत पडते की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

युक्रेनच्या खार्किव्हजवळील चुगुयेव येथील एका लष्करी विमानतळावरील हल्ल्यानंतर निर्माण झालेले काळ्या धुराचे लोट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT