ब्रुसेल्स ; वृत्तसंस्था : 'मला आणि माझ्या कुटुंबाला ठार करणे, हे रशियन फौजांचे अंतिम उद्दिष्ट आहे, हे मला ठाऊक आहे. पण, मी अखेरच्या श्वासापर्यंत कीव्हमध्येच राहीन', हा झेलेन्स्की यांचा बाणा जगभरात लोकांच्या 'सलामी'चा विषय ठरला आहे! (russia ukraine war )
युरोपियन युनियनने (ईयू) या बाण्याला एक आगळी सलामी मंगळवारी दिली. युक्रेनला संघटनेचे सदस्यत्व तर दिलेच; पण झेलेन्स्कींचे भाषण आटोपताच सगळे सभागृह उभे राहिले. झेलेन्स्की स्क्रीनवर दिसायचे थांबले; पण टाळ्या थांबत नव्हत्या!
अफगाणिस्तानात काबूलच्या वेशीवर तालिबानी फौजा धडकताच तत्कालीन अफगाण राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडून पळून गेले होते, हे उदाहरण ताजे असताना रशियन फौजा कीव्हमध्ये धडकल्यानंतरही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की हे राजधानी कीव्हमध्येच तळ ठोकून आहेत. सैन्यात मिसळत आहेत. जगभरातील नेत्यांशी बोलत आहेत. लष्करी सामग्रीची पाहणी करत आहेत.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झेलेन्स्कींचे 'ईयू'मधील भाषण आटोपल्यानंतर ईयू अध्यक्षा उर्सला वान डेर लिनही आपल्या जागेवर उभ्या राहिल्या. झेलेन्स्की म्हणाले, आम्ही आमच्या जन्मभूमीच्या रक्षणासाठी लढत आहोत.
आम्हाला आमची मुली-मुलेही वाचवायची आहेत. आमच्या शहरांना शत्रूने घेराव घातलेला आहे. एकाचवेळी आम्ही शत्रूशीही आणि युरोपियन युनियनचे सदस्यत्व मिळविण्यासाठीही लढत आहोत.
झेलेन्स्कींनी जेव्हा मुली-मुले वाचवायची गोष्ट केली तेव्हा अनुवादकाचा हुंदका दाटून आला. त्याला रडू कोसळले. झेलेन्स्की युक्रेनियन भाषेत बोलत होते.
झेलेन्स्कींचे आजोबा सिमॉन यांनी हिटलरच्या नाझी फौजांशी दोन हात केले होते. सिमॉन यांचे वडील व तिन्ही भावांना हिटलरच्या फौजांनी जिवंत गाडले होते. घाबरून पळून जाण्याऐवजी त्याचा सूड सिमॉन यांनी उगवला आणि शेतकरी, कामगारांची फौज बनवून रशियन रेड आर्मीला येऊन मिळाले. जर्मन फौजांची सिमॉन यांनी दाणादाण उडविल्याचे इतिहासातही नमूद आहे.
रशियाने युक्रेनच्या सीमांवर फौजा तैनात करताच झेलेन्स्कींनाही देश सोडा, असा प्रस्ताव अमेरिकेने दिला होता. पुढे झेलेन्स्कींना कीव्हमधून एअरलिफ्ट करण्याचाही प्रस्ताव दिला. पण झेलेन्स्कींनी तो स्वीकारला नाही… शांतता आम्हाला हवी आहे. युद्ध नको आहे, चर्चेलाही तयार आहोत; पण संपूर्ण शरणागती वगैरे रशियन अटी नको आहेत, असे झेलेन्स्कींनी अत्यंत शांतपणे रशियाला सांगितलेले आहे.
अमेरिकेला, नाटोला आणि जगाला उद्देशून ते म्हणाले, 'मला शस्त्रे द्या, सैनिक होऊन माझ्यासोबत लढा, मला पळ काढण्याचा सल्ला कृपया देऊ नका… मी महान योद्धा सिमॉन यांचा नातू आहे. झेलेन्स्की आहे.
युक्रेन हा ख्रिश्चनधर्मीयबहुल देश आहे. झेलेन्स्की हे ज्यू (यहुदी) धर्मीय आहेत. युक्रेनमध्ये ज्यू अत्यल्पसंख्याक आहेत. झेलेन्स्कींचे देशप्रेम सर्व सीमा ओलांडून एक नवा मानदंड ठरले आहे.
झेलेन्स्की हे सध्या तर लष्करातही आहेत; पण राजकारणात येण्यापूर्वी ते अभिनेते, निर्माते होते. त्यांचे आजोबा सिमॉन इवानोविच हे कधीकाळी रशियाच्या (तेव्हा युक्रेन रशियाचाच एक भाग होता) रेड आर्मीत लेफ्टनंट होते.