Latest

RSA vs BAN : द. आफ्रिकेचा बांगला देशविरुद्ध आज महत्त्वपूर्ण सामना

Arun Patil

अबुधाबी : वृत्तसंस्था : गेल्या दोन सामन्यांत चमकदार कामगिरी करणार्‍या दक्षिण आफ्रिकेचा टी-20 विश्वचषक स्पर्धेत 'सुपर 12' मधील पुढील सामना बांगला देश विरुद्ध (RSA vs BAN) असेल. यावेळी लढतीत विजय मिळवत उपांत्य फेरीतील आव्हान कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेवर विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत पोहोचण्याचा आपला दावा मजबूत केला आहे. त्यांचे तीन सामन्यांत चार गुण आहेत आणि नेट रन रेटच्या आधारे ते ऑस्ट्रेलियाच्या वर दुसर्‍या स्थानी आहेत. दुसरीकडे बांगला देशच्या संघाला 'सुपर 12'मधील आपल्या तीनही लढतीत पराभूत व्हावे लागले. त्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. आता बांगला देश संघाचा प्रयत्न हा उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवत इतर संघांचे समीकरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्याचा असेल. (RSA vs BAN)

दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध मिळवलेल्या विजयात सर्व खेळाडूंनी आपले योगदान दिले. तबरेज शम्सी, एन्रिच नॉर्त्जे आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी गोलंदाजीत चमक दाखवली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बावुमाला देखील सूर गवसला आहे. त्याने गेल्या लढतीत कठीण परिस्थितीत एडन मार्कराम सोबत भागीदारी रचली. बावुमा, क्विंटन-डी-कॉक, मार्कराम, रासी वान डर डुसेन आणि रीझा हेंड्रिक्स यावर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी अवलंबून आहे. मात्र, त्यांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.

दुसरीकडे बांगला देशचा प्रयत्न हा स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा असणार आहे. त्यासाठी खेळाडूंना एकत्रित चांगली कामगिरी करावी लागेल. या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांत संघाला शाकिब-अल-हसनशिवाय खेळावे लागेल. कारण, दुखापतीमुळे तो बाहेर गेला आहे. बांगला देशच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. त्यांच्या गोलंदाजांनादेखील चमक दाखवता आलेली नाही. यासोबतच त्यांचे क्षेत्ररक्षणदेखील खराब झाले आहे. त्यामुळे सामन्यात विजय मिळवायचा झाल्यास त्यांना सर्व विभागांत चांगली कामगिरी करावी लागेल. (RSA vs BAN)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT