Latest

खेळपट्टीवर नव्हे तर क्रिकेटवर लक्ष केंद्रित करा : रोहित शर्मा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणा-या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी खेळपट्टीवरून वाद उफाळला आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवरील खेळपट्टीशी छेडछाड केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन मीडियाने केला असून कांगारू संघात मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय फिरकीपटूंबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. 2008 नंतर भारतीय संघ नागपुरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. या मैदानावर टीम इंडियाने गेल्या वेळी कांगारू संघाचा पराभव केला होता.

दरम्यान, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला की, 'आपण खेळपट्टीवर नव्हे तर क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. गुरुवारी मैदानात उतरणारे सर्व 22 खेळाडू प्रतिभावान असतील यात शंका नाही. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये बरोबरीचा सामना पाहायला मिळेल,' असे सांगत ऑस्ट्रेलियन मीडियाच्या आरोपांना फेटाळले.

संघ निवडीबाबत रोहित म्हणाला…

पहिल्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन काय असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. याबाबत रोहितला विचारले असता त्याने कोणतेही संकेत दिले नाहीत. निवडीबाबत तो म्हणाला, 'सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. यामुळे अंतिम अकरा खेळाडूंच्या संघाची निवड करणे कठीण होत आहे. परिस्थिती आणि खेळपट्टीनुसार संघ निवडला जाईल. सर्व पर्याय आमच्यासाठी उपलब्ध आहेत,' असा खुलासा केला.

'फिरकीपटूंना मदत मिळेल'

'नागपूरची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल ठरेल अशी अपेक्षा आहे. दोन्ही संघांचे कर्णधार वेगवेगळे डावपेच आखतात आणि गोलंदाजीत बदल करतात. रणनीती बनवून मार्ग तयार करणे महत्त्वाचे आहे. काही खेळाडू रिव्हर्स स्वीप शॉट मारतात, काही गोलंदाजांच्या डोक्यावरून खेळतात. कधी स्ट्राईक रोटेट करावा लागतो, तर कधी प्रतिहल्ला करावा लागतो. साहजिकच त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कर्णधार वेगवेगळ्या गोष्टी आजमावेल आणि गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात बदल करेल. अशा परिस्थितीत तुम्हाला परिस्थिती आणि योजनांनुसार खेळावे लागेल,' असेही रोहितने स्पष्ट केले.

जामठा खेळपट्टीचा विचार करता सूर्यकुमार आणि शुभमन यांच्यामध्ये कोण चांगला आहे, असे विचारले असता रोहित म्हणाला, खेळपट्टीनुसार खेळाडूंना संधी देण्याची आमची रणनिती आहे. सूर्या आणि शुबमन हे आम्हाला वेगवेगळे पर्याय देतात. गेल्या तीन-चार महिन्यांपासून गिल चांगलाच फॉर्मात आहे. त्याने सलग शतकी खेळी रचल्या आहेत. तर सूर्यानेही तो टी-20 मध्ये आपण कसे सक्षम आहोत हे दाखवून दिले आहे. आता तो कसोटी क्रिकेटसाठीही सज्ज झाला आहे. निश्चितच तो दमदार खेळी करेल असा मला विश्वास आहे.'

केएस भरला रोहितची पसंती?

इशान किशनपेक्षा केएस भरतला प्राधान्य दिले जाईल की नाही? या प्रश्नावर रोहित म्हणाला, 'तुम्हाला धाडसी निर्णय घ्यावा लागेल. ऋषभने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे, ती आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आमच्याकडे असे खेळाडू आहेत जे मधल्या फळीत संयमी कामगिरी करू शकतात. तुम्हाला पारंपरिक क्रिकेट देखील खेळण्याची गरज आहे, आमची आघाडी फळी मजबूत आहे आणि सर्व खेळाडू धावा करत आहेत.'

दुखापतग्रस्त ऋषभ पंतबाबत कर्णधार भावूक झाला. पंतची आम्हाला नक्कीच उणीव भासेल. त्याने मधल्या फळीत मोलाचे योगदान दिले आहे. त्याच्यासारख्या फलंदाजाची संघाला नेहमी गरज असेल असे मत त्याने व्यक्त केले.

चारही फिरकीपटूंचे कौतुक, पण…

रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासोबत कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनाही खेळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहितने या चौघांचेही कौतुक केले पण कोणाला संघात स्थान देणार हे उघड केले नाही, तो म्हणाला, चौघेही कलात्मक गोलंदाज आहेत. जडेजा आणि अश्विन यांनी एकत्र खूप क्रिकेट खेळले आहे. मला वाटतं अक्षर आणि कुलदीपला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी फलंदाजांवर दबाव आणला. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत अक्षरने भरपूर विकेट्स (27 विकेट) घेतल्या. कुलदीपनेही बांगलादेशविरुद्ध आपली जादू दाखवून दिली.'

रोहित म्हणाला, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे आव्हानात्मक असेल. योग्य निकालासाठी आम्ही स्वतःला सर्वोत्तम मार्गाने तयार करण्यासाठी आवश्यक काम केले आहे,' असेही त्याने सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT