पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळत आहे. यातील तीन सामने खेळले गेले असून रोहित ब्रिगेडने दोन तर विंडीजने एक सामना जिंकला आहे. अजून दोन सामने शिल्लक आहेत. हे सामने अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात खेळवले जाणार आहेत. या दोन सामन्यांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) एक मोठी अपडेट समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा पूर्णपणे बरा आहे आणि फ्लोरिडामधील सामन्यांमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध आहे.
तिसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापत झाली होती. यामुळे तो रिटायर्ड हर्ट झाला आणि पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला नाही. सामन्यानंतर त्याने दुखापतीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. सध्या ठीक आहे, पुढच्या सामन्यात आमच्याकडे काही दिवस आहेत, आशा आहे सर्वकाही ठीक होईल, असे तो म्हणाला होता.
रोहित शर्मा (Rohit Sharma) पूर्णपणे तंदुरुस्त असून तो शेवटच्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकतो, असे वृत्त आहे. एका क्रीडाविषयक वृत्त देणा-या वेबसाईटच्या माहितीनुसार, रोहित शर्मा शनिवारी (दि. 6) आणि रविवारी (दि. 7) होणाऱ्या दोन्ही सामन्यांसाठी उपलब्ध असेल.
भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा सात विकेट्सनी पराभव केला होता. त्या विजयासह रोहित ब्रिगेडने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 19 षटकांत 3 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा सलामीला आला आणि यावेळी त्याने जबरदस्त खेळी केली. त्याने 44 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 76 धावांची वादळी खेळी साकारली. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दोन्ही संघांमधील चौथा आणि पाचवा सामना 6 आणि 7 ऑगस्ट रोजी होणार आहे.