Latest

Kolhapur Crime News | कोल्हापूर : बालिंगा येथे सराफी दुकानात सशस्त्र दरोडा, गोळीबारात दोघे जखमी

दीपक दि. भांदिगरे

दोनवडे (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : बालिंगा (ता. करवीर) येथे भरदिवसा सराफी दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. दोन मोटरसायकलवरुन आलेल्या चौघांनी दुकानात शिरून गोळीबार केला आणि दुकान लुटले. कोल्हापूर- गगनबावडा मुख्य मार्गावरील वर्दळीच्या ठिकाणी कात्यायनी ज्वेलर्स या दुकानावर हा दरोडा टाकण्यात आला आहे. दुपारी पावणेदोन वाजता ही घटना घडली. या घटनेने बालिंगा परिसर हादरला आहे. (Kolhapur Crime News)

दरोडखोरांनी गोळीबार करत सराफी दुकान लुटले. यावेळी मालक आणि मालकाच्या नातेवाईकावर गोळीबार करण्यात आला. या दोघा जखमींना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी मालकाचे नाव रमेश माळी असे आहे. दरोडेखोरांनी दुकानातील कोट्यवधीचे दागिने लुटले आहेत. अवघ्या काही मिनिटांत ते मिळेल तेवढे सोन्याचे दागिने घेऊन कळेच्या दिशेने पसार झाले.

सराफी दुकानात १२ ते १५ मिनिटे गोळीबाराचा थरार सुरु होता. यावेळी अडविणाऱ्या लोकांच्यावरही दरोडेखोरांनी गोळीबार केला. दरोडेखोरांनी दुकान लुटल्यानंतर कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावर येऊनही गोळीबार केला. यामुळे मोठी दहशत निर्माण झाली.

बालिंगा येथील सराफी दुकानाच्या परिसरात गोळीची एक रिकामी पुंगळी पोलिसांना सापडली आहे.

सराफी दुकानाच्या परिसरात गोळीच्या दोन रिकाम्या पुंगळ्या पोलिसांना सापडल्या आहेत. त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
घटनास्थळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. (Kolhapur Crime New) या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी करवीर, पन्हाळा, गगनबावडा येथे नाकाबंदी केली आहे.

सांगली-मिरज रस्त्यावरील रिलायन्स ज्वेल्सवर गेल्या रविवारी भरदिवसा असाच दरोडा टाकला होता. या टोळीने सुमारे १५ कोटी रुपयांची लूट केली होती. यामध्ये केवळ ४७ हजारांची रोकड आहे, तर इतर सोन्याचे दागिने व हिरे आहेत. दरोडा टाकल्यानंतर टोळीने पळून जाण्यासाठी वापरलेली दुचाकी व कार मिरजेतील समतानगर व भोसे (ता. मिरज) येथे एका शेतात सापडली होती. ही घटना ताजी असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात अशीच दरोड्याची घटना घडली आहे. (Kolhapur Crime News)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT