पुढारी ऑनलाईन डेस्क : सासरी सुरक्षित आणि निरोगी जीवन मिळणे हा विवाहितेचा अधिकार आहे. कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्यांतर्गत सासरच्या लोकांसोबत राहताना सुरक्षित आणि निरोगी जीवन अधिकाराचा समावेश आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीवेळी स्पष्ट केले. तसेच विवाहितेने दाखल केलेल्या याचिकेवर तिच्या पती आणि सासूने चार आठवड्यांच्या आत उत्तर द्यावे, असे निर्देशही न्यायालयाने दिला.
पती आणि सासू हे मानसिक छळ करण्यासाठी घरात १० भटक्का कुत्र्यांना खायला घालातात, असा दावा विवाहितेने केला होता. आपल्या सुरक्षित आणि निरोगी जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याची याचिका तिने सत्र न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाने तिला दिलासा देण्यास नकार दिला होता. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती तुषार राव गडेला यांच्या समोर सुनावणी झाली.
विवाहितेच्या याचिकेवरील सुनाणवीवेळी न्या. गडेला यांनी स्पष्ट केले की, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, २००५ च्या तरतुदींनुसार सासरच्या घरात राहण्याच्या अधिकारात 'सुरक्षित आणि निरोगी' या व्याख्येचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज आहे. सुनावणीवेळी विवाहितेच्या वकिलांनी युक्तीवाद करताना तिच्या सासरच्या घरातील अनेक छायाचित्रे सादर केली. यामध्ये तिचा पती आणि सासूने घरात अनेक भटकी कुत्रे पाळल्याचे दिसते. या प्रकरणी आता उच्च न्यायालयाने विवाहितेच्या पती आणि सासूला चार आठवड्यांच्या आत याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मे महिन्यात होणार आहे.
हेही वाचा :