पुढारी वृत्तसेवा : सन 2021 हे (फ्लॅशबॅक २०२१) वर्ष अनेक महत्त्वाच्या घडामोडी आणि उलथापालथींनी गाजले. 'लोकल टू ग्लोबल' परिणाम घडवणार्या घटना या वर्षात घडल्या. या वर्षाला निरोप देताना सरत्या वर्षातील काही महत्त्वाच्या घटनांचा घेतलेला थोडक्यात मागोवा…
एप्रिल ते मे या काळात देशातील पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी या राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने 294 पैकी 200 हून अधिक जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. ममता बॅनर्जींची 'खेला होबे' ही घोषणा प्रचंड गाजली. तामिळनाडूत स्टॅलिन यांनी अण्णा द्रमुकचे सरकार खाली खेचत सर्वाधिक जागा मिळवून द्रमुकला सत्तेत आणले. स्टॅलिन मुख्यमंत्री बनले. आसाममध्ये दुसर्यांदा भाजपने सत्ता राखली. येथे हिमंता बिस्वा सरमा मुख्यमंत्री झाले. तर पुद्दुचेरीत प्रथमच भाजपने सरकार स्थापन केले. तेथे एन. रंगास्वामी हे मुख्यमंत्री झाले. केरळमध्ये 'सीपीएम' चे नेते आणि मुख्यमंत्री पी. विजयन यांनी पुन्हा सत्ता राखली. तथापि, मंत्रिमंडळ बनवताना त्यांनी जुन्या सर्व सहकार्यांना डच्चू दिला.
अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या मागे 'एनसीबी'च्या चौकशीचा ससेमिरा सुरू झाला होता. त्यातील सर्वात मोठी अटक ठरली बॉलीवूडचा किंग खान शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची. क्रूझ पार्टीत आर्यनच्या अटकेने देशभरातील वातावरण ढवळून गेले. यातूनच पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक आणि 'एनसीबी'चे अधिकारी समीर वानखेडे यांचे आरोप-प्रत्यारोप झाले. सध्या आर्यन जामिनावर असून, वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेऊन त्यांची चौकशी सुरू झाली आहे.
जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात 43 नव्या नेत्यांनी शपथ घेतली. यामध्ये 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्री सहभागी होते.
इस्रायलच्या गुप्तहेर तंत्रज्ञान संस्था एनएसओने विकसित केलेल्या पेगॅसस या सॉफ्टवेअरचा वापर करून झालेला हेरगिरीचा मुद्दाही चांगलाच गाजला. जगभरातील महत्त्वाचे सुमारे 1,400 मोबाइल क्रमांक तर भारतातील 300 हून अधिक मोबाइल क्रमांकाची हेरगिरी केली गेली होती. महत्त्वाच्या नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी झाल्याने भारतीय संसदेत हे प्रकरण प्रचंड गाजले. यावरून संसदेचे संपूर्ण पावसाळी अधिवेशन गदारोळातच पार पडले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी एक उच्चस्तरीय समिती नेमली.
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. भारतीय पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले. ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. मीराबाई चानूने ऑलिम्पिक इतिहासात वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले रौप्यपदक जिंकून दिले. तर, पॅरालिम्पिकमध्ये सुमीत अंतिल याने भालाफेकमध्ये सुवर्ण, अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्ण जिंकले.
इस्रायलमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भरताच्या हरनाज संधू हिने हा किताब पटकावला. पॅराग्वेची नादिया फेरीराला द्वितीय आणि दक्षिण आफ्रिकेच्या लालेला म्स्वानो हिला तृतीय स्थान मिळाले.
तोक्ते चक्रीवादळ केरळ किनारपट्टी व लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस व पूर झाला. तोक्ते वादळामुळे गुजरातच्या किनार्याला मोठा फटका बसला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'येस' चक्रीवादळाने ओडिशासह पश्चिम बंगालमधील काही भागाला या चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला. ओडिशात 5.8 लाख लोकांना, तर पश्चिम बंगालमध्ये 15 लाख लोकांचे तात्पुरते स्थलांतर केले गेले.
गुजरात, कर्नाटक, आसाम आणि उत्तराखंड या भाजपशासित राज्यांत मुख्यमंत्री बदलण्यात आले. गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या जागी भूपेंद्र पटेल, कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले गेले. उत्तराखंडात त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या जागी तिरथसिंह रावत आणि त्यानंतर पुष्करसिंह धामी हे मुख्यमंत्री झाले. आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांनी पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिल्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रिपद देऊन निवडणुकीतील विजयानंतर हिमंता बिस्वा सरमा यांना मुख्यमंत्री केले गेले.
पंजाब काँग्रेसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. दोन्ही नेत्यांतील राजकीय युद्धाचे पर्यवसान अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडण्यात झाले. तर सिद्धूंना हायकमांडने प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले. त्यानंतर चरणसिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपदी नेमण्यात आले; पण चन्नी आणि सिद्धू यांच्यातही वाद सुरू झाला आणि सिद्धूंनी प्रदेशाध्यपदाचा राजीनामा दिला. आता अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस या पक्षाची स्थापना केली असून, त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत आघाडी केली आहे. दरम्यान, चंदीगड महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 'आप' हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पारंपरिक काँग्रेस, अकाली दल, भाजप यांना बाजूलासारत येथील नागरिकांनी 'आप'चा पर्याय स्वीकारल्याचे दिसते.
केंद्र सरकारच्या तीन सुधारित कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांसमोर अखेर केंद्रातील मोदी सरकार झुकले. 19 नोव्हेंबरला मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली. 29 नोव्हेंबरला संसदेत हे कायदे चर्चेशिवाय मागे घेतले गेले. 1 डिसेंबरला राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली. त्यानंतर सरकारच्या लेखी आश्वासनानुसार दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलकही आपापल्या घरी पंजाब, हरियाणात परतले आणि शेतकरी आंदोलन समाप्त झाले. या शेतकरी आंदोलनाला देशासह जगभरातून पाठिंबा व्यक्त झाला. शेतकरी आंदोलनामुळे सरकारने दिल्लीच्या सीमांवर रस्त्यांवर खिळे ठोकून, खड्डे खणून, काँक्रिटच्या भिंती उभारून बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले होते. त्यावर पॉपस्टार रिहाना आणि पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनीही सोशल मीडियातून या आंदोलनाला पाठिंबा दिला.
उत्तराखंड राज्यातील चमोली भागात हिमस्खलन होऊन आलेल्या महापुरात 13 मेगावॅट क्षमतेचा धौलीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल (सीडीएस) बिपीन रावत यांचे तामिळनाडूमध्ये कुन्नूर येथे लष्कराच्या हॅलिकॉप्टरला झालेल्या अपघातामध्ये निधन झाले. या दुर्घटनेत बिपीन रावत यांच्या पत्नीसह लष्करी अधिकार्यांचा देखील मृत्यू झाला. महाराष्ट्रात भंडारा जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षाला आग लागून दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला. पुणे पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस कंपनीला आग लागून 18 कामगारांचा मृत्यू झाला. बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महापुरामुळे नुकसान झाले. महाराष्ट्रामध्ये तीन दिवसांत 105 ठिकाणी ढगफुटी झाली. महापूर व दरडी कोसळून 872 गावांची हानी झाली व 165 बळी गेले.
अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन सत्तेवर आले. त्यांनी जानेवारीत अध्यक्षपदाची शपथ घेतली. जानेवारीतच ट्रम्प यांच्या समर्थकांनीच कॅपिटॉल हिल या अमेरिकन संसदेच्या इमारतीत घुसून धुडगूस घातला. यात अनेकांना जीव गमवावा लागला. चिथावणीखोर ट्विट केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंटही निलंबित केले गेले.
अफगाणिस्तानून अमेरिकन सैन्य मागे घेण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असली तरी त्याच्या अंमलबजावणीला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळात प्रारंभ झाला. अमेरिकेने ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानातून एकूण 1,23,000 लोकांना बाहेर काढले आहे. यामध्ये अमेरिकन नागरिकांसह अमेरिकीच्या सहकारी मित्र देश आणि अफगाण नागरिकांचा समावेश होता. ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी एअरलिफ्ट मोहीम ठरली. या काळात नागरिक तालिबानच्या भीतीने मिळेल त्या मार्गाने स्थलांतर करू पाहत होते. अमेरिकेने सैन्य माघारीस सुरुवात केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानला पुन्हा विळखा घालून सत्तेवर ताबा मिळवला. त्यानंतर अफगाणिस्तानात शरिया या धार्मिक कायद्याची अंमलबजावणी करत महिलांवर अनेक निर्बंध लादले.
इस्रायलचे लष्कर आणि हमास या पॅलेस्टिनी संघटनेमध्ये पुन्हा युद्धास सुरुवात झाली. ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम अशा विविध धर्मियांसाठी पवित्र असलेल्या भूमीला युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले. हमासने इस्रायलवर 1600 हून अधिक रॉकेटस् डागली तर इस्रायलने अत्याधुनिक क्षेपणास्त्ररोधी यंत्रणेचा वापर करून यापैकी अनेक क्षेपणास्त्रे हवेतच निकामी केली. इस्रायलने गाझा पट्टीतील 600 ठिकाणी हल्ला चढवला. या युद्धांत गाझा पट्टीतील अनेकांचा मृत्यू झाला. या युद्धातील इस्रायलकडील मृतांचा आकडा तुलनेने खूपच कमी होता.
मार्च 2021 मध्ये इजिप्तमधील सुएझ कालव्यात एव्हर गिव्हन नावाचे महाकाय मालवाहू जहाज अडकल्याने जगभरातील व्यापारावर परिणाम झाला. त्यामुळे आशिया व युरोप दरम्यानची सागरी वाहतूक ठप्प झाली. पाच दिवसांच्या प्रयत्नानंतर हे जहाज येथून हटविण्यात यश आले.
कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे जगभरात खळबळ माजली. संसर्गाचा वेग आणि जीव घेण्याची क्षमता जास्त असल्याने या व्हेरियंटमुळेच कोरोनाची 2021 मध्ये दुसरी लाट आली. 'म्युकरमायकोसिस' अर्थात ब्लॅक फंगस तथा काळी बुरशी या विकाराची दहशत पसरली होती.
हेही वाचा :