डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. यापूर्वी जाहीर करण्यात आलेले महिलांचे आरक्षण रद्द करून आज ते पुन्हा नव्याने जाहीर करण्यात आले. बदललेल्या आरक्षणानुसार ओबीसी मधून 18 महिलांना तर खुल्या गटातून 40 महिलांना संधी प्राप्त झाली आहे. दरम्यान ज्या मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट आहेत. त्या मतदारांना स्वतःच्या प्रभागात नावे समाविष्ट करण्याची संधी नव्याने उपलब्ध झाली असल्याची माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्तांनी दिली.
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
यावेळी उपयुक्त सुनील पवार, सुधाकर जगताप, सचिव संजय जाधव, पल्लवी भागवत आदी पदाधिकारी उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महापालिकेची यंदाची निवडणूक प्रथमच पॅनल पद्धतीने होत आहे. यासाठी एकूण 44 प्रभागात 133 लोकप्रतनिधी निवडून येणार असून त्यामध्ये 50 टक्के म्हणजे 67 महिला लोक प्रतिनिधी असणार आहेत. त्यातही अनुसूचित जाती प्रवर्गामधून 13 (पैकी 7 महिला), अनुसूचित जमाती 4 (पैकी 2 महिला ) नागरिकांचा मागास प्रवर्गमधून ,(ओबीसी) 35 (पैकी 18 महिला) तर उर्वरित म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गातून 81 (पैकी 40 महिला) लोक प्रतिनिधी निवडून येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने ज्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे मतदार यादी अंतिम झालेली आहे. मात्र अजूनही जे मतदार ते राहत असलेल्या प्रभागात त्यांची नावे नसतील किंवा इतरत्र कुठेतरी त्यांची नावे असतील तर त्यांना फॉर्म नंबर 8 भरून ते राहत असलेल्या प्रभागात समाविष्ट करता येतील. येत्या आठ दिवसांत ते राहत असलेल्या प्रभाग क्षेत्र कार्यालयात जाऊन त्यांनी हे फॉर्म भरावे. त्यानंतर सदर फॉर्म तपासणी होऊन मतदार नोंदणी अधिकारी त्यावर निर्णय घेतील, असे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले. दरम्यान, या सोडतीला इच्छुक उमेदवार व नागरिकांनी पाठ फिरविल्याने सभागृह रिकामे होते.
हेही वाचलंत का ?