Latest

Nashik News : वणीत होणार आदिवासी भागातील आजारांवर संशोधन

गणेश सोनवणे

वणी(जि. नाशिक) : येथील ग्रामीण रुग्णालयात आदर्श ग्रामिण आरोग्य संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. लवकरच संशोधन केंद्र कार्यान्वीत होणार असून या केंद्राच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील आजारांवरील संशोधनाला वेग मिळणार आहे. (Nashik News)

केंद्र सरकारचा आरोग्य संशोधन विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आरोग्य संशोधनाच्या प्रोत्साहनासाठी पायाभूत सुविधांचा विकास' या योजनेअंतर्गत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यात दुसरे व नाशिक जिल्ह्यात एकमेव वणी येथे आदर्श ग्रामिण आरोग्य संशोधन केंद्र (मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट) ला मंजुरी देवून संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी ७ कोटींची तरतुद केली आहे. (Nashik News)

या संशोधन केंद्रासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यासाठी दीड कोटी रुपये सरकारने या संस्थेला दिले आहे. सदरचे संशोधन केंद्र हे वणी ग्रामिण रुग्णालयातील जुन्या कर्मचारी निवास गृहाच्या जागेत बांधण्याचे प्रस्तावित आहे. मात्र तत्पूर्वीच गेल्या आठ वर्षांपासून ट्रामा केअरसाठी बांधून ठेवलेली व ट्रामा केअरला मंजुरी अभावी धुळखात पडून राहीलेल्या इमारतीचा उपयोग व्हावा, यासाठी प्रशासनाने ट्रॉमा केअरच्या इमारतीत आदर्श ग्रामिण आरोग्य संशोधन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला व या इमारतीत राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य संशोधन संस्थेने संशोधन केंद्रासाठी आवश्यक सर्व भोतिक, तांत्रिक सुविधांची पुर्तता केली असून लवकरच सदरचे युनिट कार्यान्वीत करण्यात येणार आहे.

या युनिटच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी व ग्रामीण स्तरावर तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, नवीन तंत्रज्ञान विकसक (वैद्यकीय संस्थांमधील संशोधक), आरोग्य यंत्रणा तंत्रज्ञ (केंद्र व राज्य आरोग्य सेवा) आणि लाभार्थी (ग्रामीण भागातील रुग्ण) यांच्यात इंटरफेस सुनिश्चित करणे, देशातील आरोग्य संशोधन पायाभूत सुविधांचा अत्यंत आवश्यक असलेला भौगोलिक प्रसार सुनिश्चित करणे हा या केंद्राचा उद्देश आहे. (Nashik News)

8 संशोधन टीम राहणार कार्यरत

या संशोधन केंद्रात एकूण ८ संशोधन टीम कार्यरत राहाणार असून, यात वैद्यकिय संशोधनासाठी आवश्यक उपकरणांबरोबरच सोनाेग्राफी, इसीजी सारखे वेगवेगळे उपकरणे असतील. यातून  आदिवासी भागातील लोकांच्या आजारांवर संशोधन करण्यासाठी आयसीएमआर अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणार असून उपचार केंद्र आणि संशोधन केंद्राची सोय केली जाईल. धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक हे देखील पुढे या संशोधन केंद्रात सहभाग घेणार आहेत. हे युनिट शेजारील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांत ही संशोधनामार्फत सेवा देणार आहे. आयसीएमआर-राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य संशोधन संस्थेचे उपसंचालक व शास्त्रज्ञ डॉ. राहुल गजभिये हेे या प्रकल्पासाठी नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहात असून राज्य शासनातर्फे डॉ. कपिल अहेर, डॉ. सारीका पाटील यांचीही नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे.

या आजारांवर होणार संशोधन

ग्रामीण भागातील आजारांवर संशोधन करून प्रबोधन करण्यासाठी या ठिकाणी संशोधन केंद्र सुरू करण्यात येत आहे. सिकलसेल सारखे आजार तसेच या भागात असलेले कुपोषण, महिलांचे काही आजार, स्तनाचा कॅन्सर, महिलांच्या पोटाचा व मौखिक कॅन्सर, गरोदर महिलां मध्ये रक्ताचे प्रमाण कमी असल्याने बाळ  कुपोषिताचे प्रमाण वाढले.  त्याची वाढ होत नाही त्यासाठी उपाय योजना या बाबत संशोधन केले जाणार आहे. अनेक समस्यांवर अभ्यास करून संशोधन व प्रबोधनया संशोधन केंद्राच्या माध्यमातून केले जाणार आहे. हा परिसर आदिवासी व ग्रामीण असून काही भागात सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे. सर्प दंशा बाबत असलेले गैरसमज तसेच दंशानंतर केले जाणारे गावठी-आघोरी व घरगुती उपाय यामुळे अनेकजण दगावतात. त्या संदर्भात कारणे शोधून यावर प्रबोधन केले जाणार आहे. अश्या अनेक बाबींमुळे हे संशोधन केंद्र फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT