पुणे : पुढारी वृत्तसेवा
प्रसिद्ध मार्क्सवादी विचारवंत सुधीर बेडेकर यांचे शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात सुकन्या आगाशे ही बहीण व मलगा डॉ. निस्सीम बेडेकर असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनीसांगितले.
हजार हातांचा ऑक्टोपस या त्यांच्या पुस्तकाने या पिढीला, आपल्या वैविध्यपूर्ण व गुंतागूंतीच्या समाजाची, त्यातील उतरंडीची आणि गंभीर समस्यांची पहिल्यांदा ओळख करून दिली होती. मागोवा आणि तात्पर्य या मासिकाचे माजी संपादक असलेले सुधीर बेडेकर हे सामाजिक व राजकीय प्रश्नांचे अभ्यासक आणि मार्गदर्शक होते. पुण्यातील समाजविज्ञान अकादमीचे विश्वस्त होते.
सुधीर आणि त्यांच्या दिवंगत पत्नी श्रीमती चित्रा बेडेकर या दोघांनाही नव्या पिढीच्या विधायक आणि सर्जनशील कार्याचे खूपच कौतुक होते. सुधीर बेडेकर हे समाजात अतिशय 'हळुवार' पावलांनी वावरायचे. त्याच हळुवारपणे त्यांनी कायमचा निरोप घेतला.!