Latest

अंबानी कुटुंबाला तीन तासांत संपवण्याची धमकी, एकजण ताब्यात

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा फोनवरुन धमकी देण्यात आली आहे. त्यांना आज सोमवारी धमकीचे तीन- चार कॉल्स आले. पुढील तीन तासांत मोठी घटना घडेल, असा दावा कॉल करणाऱ्याने केला. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सतर्कता दाखवत एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. आज सकाळी मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातील लँडलाइन नंबरवर तीन-चार धमकीचे कॉल आले होते. दरम्यान, अंबानी कुटुंबियाना फोनवरुन धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. अफजल असे त्याचे नाव आहे. त्याची चौकशी सुरु आहे.

ज्या फोनवरून कॉल केले होते तो नंबर पोलिसांनी ओळखल्यानंतर संशयिताचा शोध घेण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की फोन करणारा व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे, असे वृत्त पीटीआयने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून त्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे.

रिलायन्स फाउंडेशनच्या हरकिशनदास रुग्णालयातील नंबर धमकीचे फोन आले आहेत. यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. डीबी मार्ग पोलीस या प्रकरणी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एका निवेदनात मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की "रिलायन्स फाउंडेशनने रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकीच्या कॉल्सबद्दल तक्रार दाखल केली आहे. रुग्णालयात तीनपेक्षा जास्त कॉल आले आहेत. चौकशी सुरू आहे."

गेल्या वर्षी मुकेश अंबानींच्या मुंबईतील 'अँटिलिया' या निवासस्थानाबाहेर बेवारस स्कॉर्पिओ कार सापडली होती. त्यात २० स्फोटक जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र मिळाले होते. आता पुन्हा धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT