Latest

आरसीबी चोकर्सच!

Arun Patil

बंगळूर, वृत्तसंस्था : आयपीएल मध्ये असाच एक संघ ज्याला चोकर्स म्हणून संबोधले गेले आहे ते म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB). रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २००८ मधील त्याच्या स्थापनेपासून आयपीएल चा एक भाग आहे, आणि संघात विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांच्यासह क्रिकेटमधील काही मोठी नावे आहेत. स्टार-खेळाडूंचा भरणा असूनही त्यांना कधीही IPL ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २००९, २०११ आणि २०१६ या तीन वर्षांत ते अंतिम फेरीत पोहोचले होते, परंतु या तीनही वर्षांत त्यांना अंतिम रेषा पार करता आली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबी पुन्हा एकदा चोकर्सच ठरली.

काल झालेल्या सामन्यात शुभमन गिल हे नाव रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी अशुभ ठरलं तर मुंबई इंडियन्ससाठी शुभ ठरलं. आरसीबीसाठी करो किंवा मरो असे महत्त्व असलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने ६ विकेटस्नी विजय मिळवल्याने आरसीबीचे आयपीएल २०२३ मधील आव्हान संपुष्टात आले आणि यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबी पुन्हा चोकर्सच ठरली.

२१ मे रोजी झालेल्या आयपीएलच्या साखळी सामन्यातील शेवटच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर १९७ धावा केल्या, गुजरातने हे आव्हान ५ चेंडू शिल्लक ठेवून गाठले.

कोहलीने पुन्हा एकदा 'विराट' खेळी करत यंदाच्या आयपीएलमध्ये सलग दुसरे शतक ठोकले. आयपीएलच्या इतिहासात सात शतक ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. यात त्याने ख्रिस गेल (६ शतके) याला मागे टाकले. विराट कोहलीने ६१ चेंडूंत १३ चौकार आणि १ षटकार ठोकून धावांचा पाऊस पाडत १०१ धावांची नाबाद खेळी केली. पण, विराटच्या या शतकाला शुभमन गिलच्या शतकाने झाकोळले. गिलने आपल्या शतकात ५ चौकार आणि ८ षटकार ठोकले.

आरसीबीने ठेवलेल्या १९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा पॉवर प्लेमध्ये पहिला धक्का बसला. सलामीवीर वृद्धिमान साहा १२ धावांवर बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने बाद केले. मात्र त्यानंतर सलामीवीर शुभमन गिल आणि विजय शंकर यांनी आरसीबीच्या गोलंदाजांना चोपण्यास सुरुवात केली. शुभमन गिल आणि विजय शंकर यांनी दुसर्‍या विकेटसाठी १२३ धावांची दमदार भागीदारी रचली. विजय शंकर ३५ चेंडूंत ५३ धावा करून बाद झाला. त्यावेळी गुजरात १५ व्या षटकात १४८ धावांपर्यंत पोहोचला होता. मात्र, यानंतर आरसीबीने दसुन शनाका आणि डेव्हिड मिलर यांना अनुक्रमे शून्य आणि सहा धावांवर बाद केले. यामुळे गुजरातसह मुंबईचाही बीपी वाढला होता. मात्र, दुसर्‍या बाजूने धडाकेबाज फलंदाजी करणार्‍या शुभमन गिलने षटकार आणि चौकारांची बरसात केली.

आरसीबीसाठी करो किंवा मरो असे महत्त्व असलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने ६ विकेटस्नी विजय मिळवल्याने आरसीबीचे आयपीएल २०२३ मधील आव्हान संपुष्टात आले, पण त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघ चौथ्या क्रमांकाचा संघ म्हणून प्ले-ऑफसाठी पात्र ठरला. शुभमन गिलने ५२ चेंडूंत १०४ धावा करून शतक झळकावले. रविवारच्या दोन सामन्यांतील हे तिसरे शतक ठरले. यापूर्वी विराट कोहली (आरसीबी) आणि कॅमेरून ग्रीन (मुंबई इंडियन्स) यांनी शतके केली. यापैकी विराटचे शतक व्यर्थ ठरले.

हेही वाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT