पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले महाविकास आघाडीचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी आज (दि.८) भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी धंगेकर यांचे अभिनंदन करून सत्कार केला. विरोधकांना एकत्र आणले, तर आपण जिंकू शकतो, हे धंगेकर यांच्या विजयातून सिद्ध झाले आहे, असे सांगून त्यांच्या विजयाने जार्ज फर्नांडिस यांच्या विजयाची आठवण झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
ठाकरे पुढे म्हणाले की, देशासह राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांतील लोकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सूड भावनेतून विरोधकांवर धाडी टाकल्या जात आहेत. भाजपमध्ये या, नाहीतर कारवाईला सामोरे जा, असेच वातावरण सुरू आहे. केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा घणाघाती आरोप ठाकरे यांनी केला. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सर्वसामान्य जनतेच्या हातात आहे. जनतेच्या मतांचा बुलडोझर सरकारविरोधात चालवावा लागेल, असेही ठाकरे म्हणाले.
राज्यात अनेत ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न टाळले जात आहे. सरकार होळी खेळण्यात दंग आहे, अशी टीका करून नुसते पंचनामे करण्याचे आदेश देऊ नका, तर कार्यवाही झाली पाहिजे. मविआ सरकारने जशी शेतकऱ्यांना मदत केली, त्यापद्धतीने मदत करा, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली.
हेही वाचा