जयपूर; वृत्तसंस्था : राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 20 षटकांत 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 214 धावा केल्या. आयपीएल 2023 मध्ये रविवारी एकाच दिवशी दोन शतके हुकली. दुपारच्या लखनौविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल 94 धावांवर नाबाद राहिला, तर रात्रीच्या सामन्यात राजस्थानचा जोस बटलर 95 धावांवर बाद झाला.
राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलर शिवाय संजू सॅमसनने 66 धावा ठोकत संघाला 200 पार पोहोचवले. यशस्वी जैस्वालनेही 18 चेंडूंत 35 धावांची खेळी करत राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली होती.
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानाची स्टार सलामीवीर जोडी यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी धडाकेबाज सुरुवात केली. या दोघांनी पाचव्या षटकातच राजस्थानचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र, पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्को जॉन्सनने 18 चेंडूंत 35 धावा ठोकणार्या यशस्वी जैस्वालला बाद केले.
त्यानंतर संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. बटलर त्याला साथ देत होता. या दोघांनी 9 षटकांत राजस्थानला 95 धावा करून दिल्या. यानंतर बटलरने देखील आपला गिअर बदलत आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली.
संजू सॅमसन आणि जोस बटलर यांनी दुसर्या विकेटसाठी 138 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. संजूने अर्धशतक पूर्ण केले, तर बटलर आपल्या शतकाच्या जवळ आणि राजस्थानही द्विशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. मात्र भुवनेश्वर कुमारने 95 धावांवर असलेल्या बटलरला पायचित बाद केले. बटलरने 59 चेंडूंत 10 चौकार आणि 4 षटकार मारून ही खेळी सजवली. यानंतर संजूने 38 चेंडूंत नाबाद 66 धावा ठोकत हेमटायरच्या साथीने 10 व्या षटकात राजस्थानला 200 च्या पार पोहोचवले. राजस्थानने 20 षटकांत 2 बाद 214 धावा करत हैदराबादसमोर विजयासाठी 215 धावांचे मोठे आव्हान ठेवले.
हेही वाचा;