पुढारी ऑनलाइन डेस्क : पाकिस्तानातील पेशावर येथील प्रसिद्ध किस्सा ख्वानी बाजारातील कपूर हवेलीच्या Raj Kapoor Haveli मालकीची मागणी करणारी याचिका पाकिस्तान न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या हवेलीच्या मालकीची मागणी करणारी याचिका तिच्या सध्याच्या मालकांनी केली आहे. मात्र, या हवेलीला पाकिस्तानच्या पुरातत्व विभागाने 2016 मध्ये एका अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय वारसा घोषित केले होते. त्यामुळे या हवेलीच्या मालकीची मागणी करणारी याचिका पाकिस्तान न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती इश्तियाक इब्राहिम आणि अब्दुल शकूर यांचा समावेश असलेल्या पेशावर उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने गुरुवारी याचिकाकर्त्याचा मालकी हक्काचा खटला फेटाळून लावला.
या हवेलीचे सध्याचे मालक आणि याचिकाकर्ते सईद मुहम्मद हे आहेत. त्यांचे वकील सबाहाऊद्दीन खट्टक यांनी याचिकाकर्ते सईद यांची बाजू मांडताना न्यायालयाला सांगितले. की सईद यांच्या वडिलांनी 1969 मध्ये लिलावादरम्यान स्पर्धात्मक बोली लावून ही हवेली खरेदी केली होती. त्याची किंमतही दिली होती आणि संपादन प्रक्रिया सुरू होईपर्यंत ते पूर्ण मालक म्हणून राहिले होते.
खट्टक यांनी पुढे दावा केला की दिवंगत राज कपूर आणि त्यांचे कुटुंब या मालमत्तेचे कधी वास्तव्य किंवा मालकीचे होते हे सिद्ध करण्यासाठी प्रांतीय सरकारच्या कोणत्याही विभागाकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. तथापि, खंडपीठाने वकिलांना सांगितले की हे प्रकरण दिवाणी न्यायालयात नेले पाहिजे.
सध्या ही हवेली अतिशय जीर्ण अवस्थेत आहे आणि त्याच्या सध्याच्या मालकांना त्याचे मुख्य स्थान लक्षात घेऊन इमारत पाडून एक व्यावसायिक प्लाझा बांधायचा आहे. मात्र, पुरातत्व विभागाला हवेलीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचे जतन करायचे असल्याने अशा सर्व हालचाली थांबवण्यात आल्या तसेच याचिकाकर्त्याची याचिका फेटाळून लावण्यात आली.
राज कपूर यांचे वडिलोपार्जित घर, कपूर हवेली म्हणून ओळखले जाते, हे पेशावरच्या प्रसिद्ध किस्सा ख्वानी बाजारात आहे. हे दिग्गज अभिनेते राजकपूर यांचे आजोबा दिवान बसेश्वरनाथ कपूर यांनी 1918 ते 1922 दरम्यान ही हवेली बांधली होती. राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म येथे झाला. १९९० च्या दशकात ऋषी कपूर आणि त्यांचा भाऊ रणधीर यांनी या साइटला भेट दिली होती.
हे ही वाचा :