मुंबई : पुढारी वृत्तसेवा
हिवाळा सरत आला तरी पाऊस काही पाठ सोडत नाही. कोकणासह पश्चिम तसेच मध्य महाराष्ट्रात शनिवार- रविवारी पावसाची शक्यता (weather forecast) हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सोमवार आणि मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स अर्थात पश्चिमी चक्रावातामुळे पुढील २ दिवसांत उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ आकाश राहील आणि हलका पाऊस पडू शकतो. येत्या २ दिवसांनंतर, राज्यात किमान तापमानात २ ते ४ अंशांने हळूहळू घसरण होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किचिंत वाढ झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
उत्तर भारतामधून येणार्या शीतलहरींचा वेग मंदावल्याने थंडीचा जोर ओसरला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. नाशिक शहरात शुक्रवारी (दि.२१) पारा १२.३ अंश सेल्सियस इतका नोंदविण्यात आला. गेल्या आठवड्यात राज्यातील अवकाळी व गारपीट तसेच उत्तर भारतामधून येणार्या थंड वार्यांमुळे नाशिक जिल्ह्यातील पार्यात लक्षणीय घट झाली होती. परिणामी जिल्हावासीयांना हुडहूडी भरली होती. दिवसाही हवेतील आर्द्रता कायम असल्याने नागरिक उबदार कपड्यांची मदत घेत होते. मात्र, गेल्या ४८ तासांपासून जिल्ह्यातील हवामान कोरडे झाले आहे. परिणामी हवेतील गारठाही कमी झाला आहे. दरम्यान, २३ व २४ तारखेला राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हे ही वाचा :