Latest

रायगड: कामोठे वसाहत येथे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे अपघातातून बचावले

अविनाश सुतार

पनवेल: पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोचला आहे, चौक सभा, मतदाराच्या गाठीभेटी, तसेच सभा घेऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन उमेदवाराकडून केले जात आहे. या प्रचारार्थ मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या चौक सभेचे आयोजन कामोठे वसाहतीमध्ये करण्यात आले होते. त्या निमित्ताने बाईक रॅली  काढली होती. यादरम्यान लागलेल्या आगीत उमेदवार आप्पा बारणे बालंबाल बचावले. अन्यथा, मोठा अनर्थ घडला असता. मात्र, या आगीत सेक्टर ७ मधील भगवा झेंडा जळाल्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करत  रविवारी रात्री कामोठे पोलीस ठाण्याला घेराव घातला. हलगर्जीपणा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघात कामोठे वसाहतीमध्ये स्वागत, बाईक रॅली आणि सभेचे आयोजन केले होते. बारणे यांच्या प्रचार बाईक रॅलीला सुरूवात झाली. यावेळी कामोठे सेक्टरमधील ७ एमएनआर शाळेच्या चौकात मोठा हार बारणे यांना घालण्यात आला. यावेळी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली. फटक्यांमुळे  चौकात शिवजयंती निमित्ताने लावलेल्या मोठ्या भगव्या झेंड्याला आग लागली. याचवेळी बारणे यांची प्रचाराची गाडी या झेंड्याखाली आली. झेंड्याने पेट घेतल्यामुळे झेंड्याचे कापडी तुकडे बारणे यांच्या गाडीवर पडण्यास सुरवात झाली. तसेच एक कापड टायरला जाऊन चिकटला.

वाहन चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. झेंडा जळून खाक झाल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. मात्र, कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी शिवप्रेमींची समजूत काढत नवीन  झेंडा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवप्रेमीं शांत झाले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT