नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: काहीही झाले तरी कोणीही संविधान बदलू शकत नाही, भाजप संविधान बदलेल, असे म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी चुकीची आणि आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत, या संदर्भात त्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार का?
- संविधान बदलण्याबाबत भाजपविरोधात चुकीची आणि आक्षेपार्ह वक्तव्य
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला धक्का लावण्यासाठी भाजप संविधान बदलेल,
- भाजपने स्पष्टीकरण देऊनही वारंवार संविधान बदलाचा पुनरुच्चार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कायमच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण केले. काहीही झाले तरी कोणीही संविधान बदलू शकत नाही. मात्र, राहुल गांधी भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलेल, असा चुकीचा दावा करतात, त्यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, असे आठवले यांनी सांगितले.
रामदास आठवले म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाची भावना वास्तवात उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र राहुल गांधी आणि विरोधकांची इंडिया आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला धक्का लावण्यासाठी भाजप संविधान बदलेल, अशी भाषा करत आहेत. कुठल्याही परिस्थितीत असे होऊ शकत नाही. पंतप्रधान मोदींसह भाजपने यावर स्पष्टीकरण देऊनही राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील नेते वारंवार या वक्तव्याचा पुनरुच्चार करत आहेत, म्हणून याप्रकरणी राहुल गांधींची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली," असेही आठवले म्हणाले.
"पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आरक्षणाला धक्का लावणार नाही. भाजप संविधान बदलवेल हे आक्षेपार्ह विधान आहे. तसेच भाजप मुस्लिमविरोधी आहे,असे म्हणत काँग्रेस भाजप आणि मोदींविरुद्ध चुकीची माहिती पसरवत आहे. देशात २६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून पंतप्रधान मोदींच्या काळात सुरू झाला. काँग्रेसने मात्र ते केले नाही. तसेच काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठीही काही केले नाही. मुंबईत इंदू मिलच्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार होत आहे. त्यासाठी एनडीए सरकारने काम केले आहे. पंतप्रधान मोदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करत आहेत, असेही आठवले म्हणाले.
एनडीएच पुन्हा सत्तेत येईल
"देशात एनडीएसाठी अनुकूल वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर देशातील जनतेचा विश्वास आहे. उत्तरेत भाजप आधीच मजबूत आहे, कर्नाटक, तेलंगणासह दक्षिणेतही भाजपला चांगल्या जागा मिळतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तर जातिनिहाय जनगणनेबाबत बोलताना आठवले म्हणाले की, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही मी केलेली मागणी आहे. मी यावर राज्यसभेतही बोललो आहे. काँग्रेसने माझी मागणी कॉपी केली आहे, असेही ते म्हणाले."
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.