Latest

Radhanagari Dam : राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे सत्तरीतही सक्षम

दिनेश चोरगे

कौलव :  राजर्षी शाहू महाराजांच्या सिंचन धोरणाचे प्रतीक असलेल्या राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे सत्तर वर्षांनंतरही सक्षमपणे कार्यरत आहेत. कोणत्याही यांत्रिक ऊर्जेशिवाय चालणारे हे दरवाजे एकमेव स्वयंचलित दरवाजे असून, धरणाच्या मजबुतीला आधार देत आहेत.

राजर्षी शाहू महाराजांनी 1909 साली राधानगरी धरणाची पायाभरणी केली होती. या धरणाचा स्थापत्य आराखडा जगप्रसिद्ध स्थापत्य अभियंता डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांनी केला होता. येथील स्वयंचलित दरवाजांची रचना देशातील अन्य कोणत्याही धरणाला नाही, त्यामुळे हे दरवाजे ऐतिहासिक ठेवा आहेत. प्रत्येकी 14.48 बाय 1.48 मीटर्स आकाराच्या या सात दरवाजांतून प्रतिसेकंद दहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होतो. प्रत्येक दरवाजाच्या आतील बाजूला प्रत्येकी 35 टन वजनाचे सिमेंट काँक्रिटचे ब्लॉक्स बसवले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्त पाण्याच्या दाब लोखंडी दरवाजावर पडताच ब्लॉक्स वर उचलले जातात व स्वयंचलित दरवाजातून पाणी बाहेर फेकले जाते.

या ब्लॉक्सवरील दाब 35 टनांपेक्षा खाली आला असता ब्लॉक खाली बसतात. त्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबतो. धरणात क्षमतेपेक्षा जादा होणार्‍या पाण्याचा विसर्ग या सात दरवाजांतून होतो. त्यामुळे धरणाची सुरक्षितता राहते. 1952 साली धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर या दरवाजांची रचना केली आहे. त्यामुळे या दरवाजांना 71 वर्षे पूर्ण होऊनही आज हे दरवाजे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यासाठी वापरलेले लोखंडी साहित्य दर्जेदार आहे. या दरवाजांचा देखभाल-दुरुस्तीचा खर्चही नाममात्र आहे. दरवर्षी केवळ ग्रीसिंग, ओव्हर ऑईलिंग केले जाते. सिमेंट काँक्रिटच्या ब्लॉकची डागडुजी केली जाते.

या दरवाजांच्या जागी वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव होता; मात्र तो शाहूप्रेमी जनतेच्या विरोधामुळे बारगळला होता. पुन्हा या दरवाजांच्या उत्तरेला असे दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, हा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे धूळखात पडला आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT