Latest

अजित पवारांच्या भूमिकेवर ठरणार पुरंदरचे टेकऑफ

अमृता चौगुले

पुणे : पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. जुन्या जागेवरील प्रस्तावाला दिल्लीतून हिरवा कंदील दाखविण्यात आलेला आहे. मात्र, जुन्या-नव्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शासनाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कडक भूमिका घ्यावी लागेत, असे संकेत अजित पवार यांनी दिलेले आहेत. ती भूमिका पुरंदरबाबतीतही राबविली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या घोषणेच्या घिरट्या मागील पंधरा वर्षांपासून सुरू आहेत. पुणे शहराची ओळख बदलत असल्याने पुणेकरांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे आवश्यक बनले आहे. जीडीपीच्या वाढीसाठी विमानतळाचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

मात्र, पुरंदर येथील दोन जागेच्या वादात मागील दोन वर्षांपासून विमानतळ रखडल्याचे दिसून आले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात दुसर्‍याच जागेचा प्रस्ताव पुढे आला होता. हे विमानतळ बारामतीच्या दिशेला सरकविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. बागायती जमीन विरुद्ध जिरायती जमीन, असाही वाद उफाळून आला. स्थानिक नेत्यांच्या भूमिका परस्परविरोधी झाल्याने परवानग्या मिळूनदेखील हे विमानतळ पुढे सरकले नाही.

आता राजकीय परिस्थिती बदलल्याने विमानतळाचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. अजित पवार यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिल्याने अजित पवारांच्या मध्यस्थीने पुरंदरच्या जागेचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अजित पवारांनी कडक भूमिका घेतल्यास रिंगरोडपाठोपाठ पुरंदर विमानतळाचादेखील प्रश्न तातडीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे. जागेचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर दिल्लीतून निधीदेखील विमानतळासाठी तातडीने मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी चर्चा आता प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.

उच्चस्तरीय समितीकडून लवकरच भूसंपादनाची अधिसूचना

पुरंदर विमानतळाबाबत राज्य सरकार एमआयडीसी कायद्यानुसार भूसंपादन करणार असले, तरी नियोजन विकास समिती म्हणून एमआयडीसी केवळ भूसंपादनासाठीची अधिसूचना काढण्यापुरती आहे की एमएडीसीकडे नियोजन ठेवणार आहे. याबाबत अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, एमआयडीसीच्या भूसंपादन कायद्यानुसार भूसंपादन करण्यात येणार आहे, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी प्रस्ताव प्राप्त होताच अधिसूचना काढण्यात येईल. येत्या काही दिवसांत ही कार्यवाही पूर्ण होईल.

पुरंदर विमानतळाच्या जुन्या जागेकरिता केंद्र सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे. या जागेकरिता यापूर्वीच शंभर टक्के परवानग्यादेखील दिलेल्या आहेत. यामुळे रिंगरोड, मेट्रोपाठोपाठ आता पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. अजित पवार आमच्यासोबत आल्याने स्थानिक नेत्यांबरोबर चर्चा करून जागेचा प्रश्न लवकर मार्गी लावतील आणि पुरंदरचे विमानतळ तातडीने मार्गी लागेल, असा मला विश्वास वाटतो.

– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT