अमृतपाल सिंग  
Latest

खलिस्‍तान समर्थक अमृतपाल सिंगला दणका, सहा साथीदार ताब्‍यात ; पंजाबमधील इंटरनेट सेवा बंद

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंजाब पोलिसांनी खलिस्तानी समर्थक आणि 'वारस पंजाब डे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग यांच्यासह त्‍याच्‍या समर्थकांवर धडक कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी अमृतपाल सिंग याच्‍या ६ साथीदारांना ताब्‍यात घेतल्‍याचे वृत्त आहे.    दरम्‍यान, कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित ठेवण्‍यासाठी सरकारने पंजाबमधील इंटरनेट सेवा रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत स्‍थगित केली आहे. तर भटिंडा जिल्ह्यात अनेक ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

जालंधरमधील मेहतपुर येथे त्‍याच्‍या ताफ्‍याला पोलिसांनी राखले. यावेळी त्‍याच्‍या सहा साथीदारांना ताब्‍यात घेतले आहे. मात्र अमृतपाल सिंग घटनास्‍थळावरुन पसार झाला असून, पोलिस त्‍याच्‍या मागावर आहेत.

पोलिसांनी अमृतपाल सिंगच्‍या साथीदारांकडून शस्‍त्रे जप्‍त केल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. पंजाब पोलिसांनी यापूर्वीच अमृतपाल सिंग यांच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी दोन द्वेषपूर्ण भाषणाशी संबंधित आहेत.

कोण आहे अमृतपाल सिंग ?

खलिस्तानी शक्तींना एकत्र करणारा अमृतपाल सिंग ( वय ३० ) पंजाबमध्ये 'वारीस पंजाब दे' ही संघटना चालवतो. ही संघटना अभिनेता-कार्यकर्ते दीप सिद्धू यांनी स्थापन केली होती. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी दीप सिद्धूचा रस्ता अपघातात मृत्यू झाला, त्यानंतर काही महिन्यांपूर्वी दुबईहून परतलेल्या अमृतपाल सिंह यांनी या संघटनेची सूत्रे आपल्‍याकडे घेतली. तो या संघटनेचा प्रमुख झाला. दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर 'वारीस पंजाब दे' वेबसाइट तयार करून लोकांना जोडण्यास सुरुवात केली. अमृतपाल २०१२ मध्ये दुबईला गेला होता. त्यांचे बहुतेक नातेवाईक दुबईत राहतात. अमृतपाल याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे.

पोलीस ठाण्यावर केला होता हल्‍ला

फेब्रुवारी २०२३ मध्‍ये अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांनी पंजाबमधील अजनाळा येथील पोलीस ठाण्यावर शस्त्रांसह हल्ला केला होता.अमृतपालच्या समर्थकांनी अपहरण आणि दंगलीतील एक आरोपी तुफानच्या सुटकेसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. यावेळी अमृतपाल सिंग यांच्‍या साथीदारांनी केलेल्‍या हल्‍ल्‍यात सहा पोलीस जखमी झाले होते.

साथीदाराने केली होती तक्रार

अमृतपाल यांच्या माजी सहकारी बरिंदर सिंग याने त्‍याच्‍याविरोधात पहिली तक्रार दिली होती. त्‍याने तक्रारीत म्हटले आहे की, तो अमृतपाल सिंगचा चाहता होता, पण जेव्हा त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टी सोशल मीडियावर उघड केल्या तेव्हा अमृतपाल सिंग याला राग आला. अमृतपाल सिंग याने बरिंदरला शिवीगाळ करत मारहाण केली. रुपनगर जिल्ह्यातील सलेमपूर गावातील रहिवासी असलेल्या बरिंदरला अमृतपाल व त्‍याच्‍या साथीदारांनी तीन तास मारहाण केल्‍याचेही त्‍याने तक्रारीत म्‍हटले आहे. तसेच बरिंदर सिंग यांनी अमृतपाल सिंग याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT