पुणे : पुढारी वृत्तसेवा; सेवानिृत्त कर्नलने आपल्या पत्नीवर डबल बोअरच्या रायफलमधून गोळी झाडून तिचा खून केला व त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. निवृत्त कर्नल नारायणसिंग बोरा (वय ७५), चंपा बोरा (वय ६३, रा. सिटाडेल सोसायटी, बी. टी. कवडे रोड, घोरपडी) अशी दोघांची नावे आहेत. मात्र आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. ही घटना घोरपडी गावातील बी. टी. कवडे रस्ता येथील सिटाडेल सोसायटीमध्ये घडली आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, निवृत्त कर्नल बोरा हे पत्नीसह रहात होते. त्यांचा एक मुलगा व जावई दोघेही लष्करात आहेत. दुसरा मुलगा मुंबईत रहातो. मुलगी दिल्लीत स्थायिक आहे. त्यांचा मुलगा वडिलांना फोन करत होता. परंतु, ते फोन उचलत नसल्याने त्याने आपल्या मित्राला घरी पाठविले. मात्र, ते दरवाजा उघडत नसल्याने या मित्राने ही बाब सोसायटीच्या सेक्रेटरीला कळविली. त्याने मुंढवा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा दोघेही मृतावस्थेत आढळून आले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.