file photo 
Latest

पुणे : ५ लाखांची लाच मागणारा हवालदार निलंबित

निलेश पोतदार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी झिरो पोलिसांच्या माध्यमातून एक लाख रूपये लाच घेणार्‍या सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. ज्ञानेश्वर दिनकर माडीवाले असे निलंबित करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे. माडीवाले याने गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी तक्रारदाराकडे आणखी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे देखील समोर आले आहे.

दरम्यान, दोन दिवसापुर्वी सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील कर्मचारी श्रीधर पाटील यांना देखील वसुली करत असल्याच्या आरोपावरून निलंबीत करण्यात आले आहे. त्यानंतर माडीवाले यांचा हा प्रकार समोर आला आहे. अवघ्या दोन दिवसांत उपायुक्त गायकवाड यांनी गैरकृत्य करून पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणार्‍यांना चांगलाच दणका दिला आहे.

झिरो पोलीस मिलिंद चौरे यांच्यामार्फत 13 डिसेंबर 2021 रोजी माडीवाले यांनी एक लाखाची लाच घेतली. माडीवाले हे सिंहगड रोड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. दरम्यान, फिर्यादी यांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे अर्ज केला होता. सिंहगड रोड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तामार्फत अर्जाची चौकशी झाली. यानंतर त्यांनी अहवाल दिल्यानंतरही माडीवाले यांनी उशीरा गुन्हा दाखल केला. 20 ऑक्टोंबर 2021 रोजी दिलेल्या अर्जाचा माडीवाले यांनी जाणीवपुर्वक 24 जानेवारी 2022 रोजी गुन्हा दाखल करून घेतला. त्यासाठी फिर्यादीकडून एक लाख रूपये लाच घेतली. तसेच, गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी आणखी पाच लाख रुपयांची मागणी केली.

फिर्यादींनी पैसे न दिल्याने आरोपींना जामिन घेण्याचा सल्लाही माडीवाले यांनी दिला. आरोपींना गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे. माडीवाले यांनी केलेले कृत्य हे शासकीय कर्तव्यात अत्यंत बेपरवाईचे, बेजबाबदारपणाचे असून, पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT