पुढारी ऑनलाईन : आम्ही २०४७ पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याच्या दिशेने काम करत असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले आहे. लक्षद्वीपसह अनेक बेटांवर पर्यटनासाठी प्रकल्प हाती घेतले जातील, असे सीतारामन यांनी सांगितले. अध्यात्मिक पर्यटनासह इतर पर्यटनाच्या वाढीला मोठी संधी आहेत. आयकॉनिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्या म्हणाल्या. (Nirmala Sitharaman Budget Speech)
"देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी लक्षद्वीपसह बेटांवर बंदर कनेक्टिव्हिटी, पर्यटन पायाभूत सुविधा आणि सुविधांचे प्रकल्प सुरू केले जातील." असे त्यांनी सांगितले.
गेल्या १० वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत खूप मोठे परिवर्तन झाले आहे. २०१४ मध्ये देशासमोर मोठी आव्हाने होती. सरकारने त्या आव्हानांवर मात करून संरचनात्मक सुधारणा हाती घेतल्या. लोकानुकूल सुधारणा हाती घेतल्या, असे त्या म्हणाल्या.
पीएम जन-धन खाती वापरून थेट लाभ हस्तांतरणाद्वारे ३४ लाख कोटी रुपये जमा करण्यात आल्याने सरकारची मोठी बचत झाली. बचतीमुळे गरीबांच्या कल्याणासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्यास मदत होत आहे.
आमचे सरकार सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी विकासाच्या दिशेने काम करत आहे, त्यात सर्व जाती आणि स्तरातील लोकांचा समावेश होतो. प्रत्येक घर आणि व्यक्तीला लक्ष्य केले आहे. ८० कोटी लोकांच्या मोफत रेशनद्वारे अन्नाची चिंता दूर झाली. अन्नदात्याच्या उत्पादनासाठी एमएसपीत वेळोवेळी वाढ केली आहे. मुलभूत गरजांच्या तरतुदीमुळे ग्रामीण भागात खरे उत्पन्न वाढले असल्याचे त्यांनी नमूद केले.
'पीएम किसान सन्मान' योजनेंतर्गत दरवर्षी ११.८ कोटी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते, ज्यात अल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांचा समावेश आहे. 'पीएम पीक विमा' योजनेअंतर्गत ४ कोटी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आला आहे, असेही त्या म्हणाल्या.
हे ही वाचा :