चाकण : पुढारी वृत्तसेवा
परभणी जिल्हयातील गंगाखेड येथील वाळुच्या ठेक्याचे कारणावरून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश प्रभाकर डोंगरे (वय ३३, रा. धनेवाडी, ता. पालम, जि. परभणी) व राजेश सुभाषराव बोबडे (वय ४३, रा. गोपा, ता. गंगाखेड, जि. परभणी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दि. २४ मार्च २०२२ रोजी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे वाळुची अवैधरित्या वाहतुक करण्यावरून वाद झाला होता. त्यामधून माधव त्रंबकराव शिंदे (रा. रावराजापुर, ता. पालम, जि. परभणी) याचा प्रकाश डोंगरे व त्याच्या सहकाऱ्यांनी बेकायदेशीर जमाव जमवुन खुन केला होता. याबाबत गंगाखेड पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. हे खून प्रकरण संपुर्ण महाराष्ट्रभर गाजले होते.
चाकण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चाकणमधील एका गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी हॉटेल तसेच लॉजची तपासणी करीत होते. यादरम्यान चाकण येथील हॉटेल ड्रिम लॅन्ड येथे दोघेजण राहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे दोघे परभणी येथील रहिवासी असल्याचे माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यांच्याकडे चौकशी करत असताना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी त्यांची कसुन चौकशी केली. त्यानंतर परभणी येथील गंगाखेड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पळून चाकण येथे आल्याचे निष्पन्न झाले.
चाकण पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन गंगाखेड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांच्या पथकाने केली.