Latest

गॅरंटी तीन शब्दांचा खेळ नाही : पंतप्रधान मोदी

दिनेश चोरगे

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : गॅरंटी देण्यासाठी खूप हिंमत लागते. ती अशीच देता येत नाही. माझ्यासाठी गॅरंटी हा तीन अक्षरांचा खेळ नाही; तर प्रत्येक क्षणाची मेहनत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (श्यामजी पंत) येथे महायुतीचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदास तडस, अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

वर्ध्यासोबत असलेल्या नात्याचा आवर्जून करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, मी गुजरातमध्ये जन्मलो. पण, वर्धा आणि अमरावती यांच्याशी माझे विशेष नाते आहे. बापूंचा जन्म गुजरातमध्ये झाला. पण, वर्धा त्यांची कर्मभूमी राहिली. त्यामुळे या भूमीशी माझे आत्मिक नाते आहे. ही निवडणूक आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची निवडणूक आहे. बापूंनी ते स्वप्न पाहिले होते. त्याच दिशेने आता आपण जात
आहोत, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, 2014 पूर्वी ही धारणा झाली होती की, या देशात काही चांगले होऊच शकत नाही. सगळीकडे निराशा होती. गॅरंटी देण्यासाठी खूप हिम्मत लागते. ती अशीच देता येत नाही. माझ्यासाठी ही गॅरंटी तीन शब्दांचा खेळ नाही. प्रत्येक क्षणाची मेहनत आहे. महाराष्ट्रात 2014 पूर्वी अनेक सिंचन योजना रखडल्या होत्या. त्या पूर्ण करत आहे. या संपूर्ण परिसरात सिंचनाचे अनेक छोटे प्रोजेक्ट आणतो आहे. अयोध्येत पाचशे वर्षानंतर रामलल्लाची स्थापना झाली. त्यावरही इंडिया आघाडीमधील लोक टीका करतात. कॉग्रेसला माहिती आहे ते निवडणूक जिंकू शकत नाहीत, असेही मोदी म्हणाले.

काँग्रेस , इंडिया आघाडीवर शरसंधान

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, काँग्रेसमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. इंडिया आघाडी एकेका मतासाठी कंगाल झालेली आहे. यामुळे ते शिव्या देण्याचे आणि अपमानास्पद बोलण्याचे राजकारण करत आहेत. जे लोक सनातनला संपवण्याची भाषा करतात, त्यांना महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर आणून त्यांच्याबरोबर इंडिया आघाडी रॅली आयोजित करत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. आपण  निवडणूक जिंकू शकत नाही हे माहिती असल्याने काँग्रेस पक्ष निकालानंतर देशात आग लावण्याची धमकी देत आहे. ज्यांनी देशात आणीबाणी घोषित केली, त्यांची मानसिकता आजही बदलली नाही. त्यामुळे देशाने हे निश्चित केले आहे की, देश मजबूत, निर्णायक हातात द्यायचा, असेही ते म्हणाले.

विदर्भाकडे विशेष लक्ष

टेक्स्टाईल उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी देशभर टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येत असून त्यातील एक अमरावतीत बनत आहे. विदर्भावर आता मागासलेपणाचा शिक्का राहणार नाही. विदर्भात बांधण्यात येत असलेले हायवे, एक्सप्रेस वे, रेल्वे हे शेतकर्‍यांच्या समृद्धीचे महामार्ग बनतील यात शंका नाही. वर्धा आणि अमरावतीमध्ये असलेली सिंचनाची समस्या इथल्या शेतकर्‍यांसाठी संकटाचे कारण होते. परंतु मागच्या सरकारने या विषयावर इमानदारीने काम केले नाही. मागच्या सरकारमध्ये अनेक सिंचनाच्या योजना रखडल्या होत्या, त्यामध्ये महाराष्ट्रातील सिंचनाच्या योजना सर्वाधिक होत्या. लोअर वर्धा लोअर इरिगेशन प्रोजेक्ट शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणार आहे. या संपूर्ण क्षेत्रात सिंचनासाठी छोटे छोटे प्रोजेक्ट आणले जात आहेत. अमरावतीच्या संत्र्यांना एक जिल्हा एक प्रॉडक्ट या योजनेअंतर्गत विशेष भौगोलिक ओळख वेगळी ओळख दिली जात आहे.

या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, रामदास तडस, नवनीत राणा, अनिल बोंडे, प्रवीण पोटे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT