Latest

आधी भाजपचे सरकार असलेल्या राज्यातील मशिदीवरील भोंगे उतरवा : प्रवीण तोगडीया

नंदू लटके

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
भोंग्यांवरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले आहे. राज्यातील भाजपचे त्याला समर्थन आहे. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे; पण भोंगे प्रकरणावर दुटप्पी भूमिका घेण्यापेक्षा आधी भाजपची सरकार असलेल्या राज्यांमधील मशिदीवरील भोंगे उतरवा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय विहिंपचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी आज येथे केले.  मध्य प्रदेशात जाण्यापूर्वी नागपुरात अल्पकाळासाठी आले असता त्‍यांनी (दि १९) माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्रात भाजप सरकार असतानाही मशिदीवरील भोंगे होतेच

या वेळी तोगडीया म्‍हणाले, "महाराष्ट्रात भाजप सरकार असतानाही मशिदीवरील भोंगे होतेच; परंतु तेव्हा ते काढण्यात आले नाहीत. रात्री १० ते  सूर्योदयापर्यत भोंगे वाजवण्यात येऊ नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्‍यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांमधील जिल्हाधिकारी तसेच पोलिसांना तसे आदेश द्यावे". उत्तर प्रदेशातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यात यावे, अशी मागणी आम्ही १० वर्षांपूर्वीच केली होती, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

मोहन भागवत यांनी स्वत: रणगाड्यावर बसून पाकिस्तानवर हल्ला करावा

सरसंघचालक मोहन भागवत यांनी १५ वर्षात अखंड भारताचे स्वप्न पूर्ण होईल, असे वक्तव्य केले. त्याचे स्वागत आणि समर्थन करताना तोगडीया यांनी भागवत यांना अखंड भारत निर्मितीचे तीन टप्पेही आखून दिले. पहिला टप्पा म्हणजे जम्मू काश्मिरात काश्मिरी पंडितांना महिनाभरात परत आणा. तसेच एका गावात त्यांच्यासोबत एक रात्र घालवा, दुसऱ्या टप्प्यात पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन भागवत यांनी तिथे संघ शाखा लावावी. आणि तिसरा टप्पा म्हणजे मोहन भागवत यांनी स्वत: रणगाड्यावर बसून पाकिस्तानवर हल्ला करावा. या तिन्‍ही टप्प्यात आपण जातीने त्यांच्यासोबत असेन, असेही तोगडीया म्हणाले. आपली सत्ता नसताना दिलेल्या वचनांची पूर्ती करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण केंद्रात आता पूर्ण बहुमताचे सरकार आहे, याकडे तोगडीया यांनी लक्ष वेधले.

"ई-श्रमकार्ड'धारकांच्या बँक खात्यात दरमहा सहा हजार रूपये जमा करावेत

सर्व राज्ये तसेच केंद्र सरकार मिळून देशात रिक्त असलेल्या एक कोटी जागा त्वरित भरण्यात याव्या, "ई-श्रमकार्ड'धारकांच्या बँक खात्यात दरमहा सहा हजार रुपये जमा करण्यात यावे,  आदी मागण्याही तोगडीया यांनी केल्या.

भाजपजवळ स्वत:ची पापे धुवून काढण्याची वाॅशिंग मशीन आहे काय?

हिंदूत्व सोडल्याची टीका शिवसेनेवर केली जाते. पण, भाजपाला स्वत: काय केले याची आठवण नाही. रामसेवकांवर गोळीबार करणाऱ्या मुलायमसिंग यांच्यासोबत तसेच मेहबूबा मुफ्तीसोबत काश्मीरात भाजपने सत्ता स्थापन केली, तेव्हा त्यांनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप कोणी केला नाही; मग शिवसेनेवर आरोप करण्याचे कारण नाही. भाजपजवळ स्वत:ची पापे धुवून काढण्याची वाॅशिंग मशीन आहे काय? असा सवालही यावेळी तोगडीया यांनी केला.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT