Latest

Chess World Cup 2023 : प्रग्नानंद विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत जाणारा दुसराच भारतीय !

अमृता चौगुले

पुढारी ओनलाईन डेस्क : भारताच्या आर. प्रग्नानंद आणि अर्जुन इरिगेसी या दोन युवा खेळाडूंमध्ये विश्‍वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेत कमालीची चुरस पाहायला मिळाली. अखेर तीन दिवस आणि ९ गेमनंतर या लढतीतील विजेता मिळाला आहे. प्रग्नानंदने गुरुवारी ब्लिटझ्‌ गेममध्ये अर्जुन इरिगेसीचा ५-४ असा पराभव करत उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली. आता अंतिम चार फेरीच्या लढतीत त्याच्यासमोर अमेरिकेच्या फॅबियानो कॅरुआना याचे आव्हान असणार आहे. नॉर्वेचा मॅग्सन कार्लसन व अझरबैजानचा निजात एबासोव यांच्यामध्ये अन्य उपांत्य लढत रंगेल.

आर. प्रग्नानंद – अर्जुन इरिगेसी यांच्यामधील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीला मंगळवारी सुरुवात झाली. दोघांमध्ये सुरुवातीला क्लासिकल गेमचा थरार रंगला. या गेमचा पहिला टप्पा अर्जुनने जिंकला. बुधवारी झालेल्या दुसऱ्या टप्प्यात प्रग्नानंदने झोकात पुनरागमन केले आणि १-१ अशी बरोबरी साधली. या दोघांमधील बरोबरीमुळे बुधवारी पुन्हा बुद्धिबळाच्या पटावर झुंज पाहायला मिळाली.

या दिवसातील पहिले दोन्ही गेम बरोबरीत राहिले. हे दोन्ही गेम प्रत्येकी २५ मिनिटांचे होते. त्यानंतर दोन खेळाडूंमध्ये प्रत्येकी दहा मिनिटांचे दोन गेम खेळवण्यात आले. यातील पहिला गेम प्रग्नानंदने, तर दुसरा गेम अर्जुनने जिंकला. बरोबरीचा तिढा सुटेना. आता प्रत्येकी पाच मिनिटांच्या दोन गेमना सुरुवात झाली. प्रग्नानंदने पहिला गेम जिंकत आघाडी घेतली. मात्र अर्जुनने दबावाखाली खेळ उंचावला आणि पुन्हा बरोबरी साधली.

अखेर ब्लिटझ्‌ गेमने या लढतीतील विजेता ठरला. तीन मिनिटांच्या या गेममध्ये प्रग्नानंदने बाजी मारली आणि उपांत्य फेरीत घोडदौड केली. या स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडूंना जगज्जेता खेळाडू डिंग लिरेनला आव्हान देणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. मॅग्नस कार्लसन याने त्या स्पर्धेमध्ये आपण खेळणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे आता भारताच्या प्रग्नानंदला त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT