'आँखों में वैभव के सपने,
पग में तुफानों की गति हो
राष्ट्रभक्ति का ज्वर न रुकता,
आए जिस जिस की हिम्मत हो'
माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री अटलबिहारी वाजपेयी यांची ही कविता म्हणजे एकप्रकारे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचेच वर्णन आहे, असे मला नेहमी वाटत आले आहे. डोळ्यांमध्ये या महान देशाच्या वैभवाची स्वप्ने घेऊन त्यांनी वाटचाल सुरू केली. लोकांच्या प्रेमामुळे त्यांच्या या वाटचालीला एखाद्या वादळासारखी गती प्राप्त झाली. त्यांच्या हाती देशाची सूत्रे आल्यावर राष्ट्रप्रेमाचा असा जोमदार प्रवाह सगळ्यांच्याच रक्तात उसळला की, अवघा देश त्यात सामील झाला. गेली नऊ वर्षे अविरत पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत अवघ्या विश्वात देशाला आदराचे स्थान प्राप्त करून देणार्या पंतप्रधान मोदीजी यांचा आज वाढदिवस. त्यांनी या देशाला खर्या अर्थाने जगभरात सन्मानाने उभे केले, सामान्य भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना शत शत प्रणाम… आज नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस… या कर्तृत्ववान जागतिक नेत्यासाठी जीवेत् शरद: शतम् हीच भावना मनात दाटून आली आहे. मोदीजींना निरोगी, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची महासत्तेच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल अधिक वेगवान होवो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
संबंधित बातम्या :
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi) यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांचा जन्म झाला, असे ते देशाचे पहिलेच पंतप्रधान आहेत. समर्पित वृत्ती, द़ृढनिश्चय आणि रात्रंदिवस केवळ जनतेच्या प्रगतीचा ध्यास असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळेच ते अब्जावधी भारतीयांच्या इच्छा आणि आकांक्षाचे प्रतीक बनले आहेत. कार्यभार स्वीकारल्यापासूनच मोदीजींनी देशाच्या सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर जोमाने वाटचाल सुरू केली. नरेंद्र मोदीजी यांची पंतप्रधान म्हणून गेली नऊ वर्षे अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली. काँग्रेस सरकारच्या 60 ते 65 वर्षांच्या कार्यकाळात देशाचा जेवढा विकास झाला नव्हता, त्याच्या कैकपटींनी जास्त विकास गेल्या नऊ वर्षांत झाला आहे. 2014 पर्यंत देशात 70 विमानळ होते. गेल्या 9 वर्षांत 72 पेक्षा जास्त विमानतळांची उभारणी झाली आहे. 2014 पर्यंत दररोज 12 कि.मी.चे महामार्ग बांधले जात होते. ते आता 37 कि.मी.पर्यंत वाढले आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी 35 टक्क्यांवरून 99 टक्क्यांवर गेली आहे. जगातील सर्वात उंचीच्या चिनाब पुलाचे आणि जगात सर्वात उंचीवर असलेल्या अटल बोगद्याचे लोकार्पण झाले. पायाभूत सुविधांचे जाळे भक्कम झाल्यामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाला गती प्राप्त झाली आहे.
पंतप्रधानपदाच्या 9 वर्षांच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अनेक योजना जाहीर केल्या. थेट जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांनी 'मन की बात'सारखा उपक्रम सुरू केला आणि शंभरी पूर्ण करून तो आताही जोमाने सुरू आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा, यासाठी प्रधानमंत्री 'जन धन योजना' त्यांनी सुरू केली. 'मेक इन इंडिया'मुळे गुंतवणूकदार आणि उद्योजकांमध्ये उत्साह संचारला. 'श्रमेव जयते' उपक्रम लघ आणि मध्यम उद्योगांना नवे जीवन देणारा ठरला. मात्र क्रांतिकारी म्हणावे असे पहिले पाऊल त्यांनी उचलले ते नोटबंदीचे. काळ्या पैशाच्या व्यवहाराला त्यामुळे आळा बसला आणि त्याचेच पुढचे पाऊल होते 'डिजिटल इंडिया'. आज अगदी भाजीवाले, वडापाववाले, रस्त्यांवर व्यवसाय करणारेही यूपीआयचा वापर करताना दिसतात, त्याचे सगळे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi) यांच्या दूरद़ृष्टीला द्यावे लागेल.
2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) 'स्वच्छ भारत अभियान' सुरू केले होते, पुढे तिचे एका लोकचळवळीत रूपांतर झाले. या अभियानाचे यश आणि व्याप्ती ऐतिहासिक अशी आहे. 2014 पूर्वी टू जी घोटाळा, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा अशा असंख्य घोटाळ्यांच्या मालिकेमुळे देश भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये अडकला होता. महागाईने कळस गाठला होता आणि देशातील नागरिक नैराश्यात अडकले होते. विकासाची वाट खुंटली होती. नरमाईच्या धोरणाने शेजारी देश डोळे वटारून बघत होते. दहशतवादी हल्ल्यांनी भयछाया दाटली होती. त्यामुळेच या परिस्थितीत सर्वार्थाने बदल घडवण्याचा निर्णय देशवासीयांनी घेतला. यानंतर भारतामध्ये विकासाचे नवे पर्व सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर संपूर्ण देशवासीयांनी विश्वास दाखवत त्यांच्या हाती देश सोपवला आणि प्रगतीला गती आली. देव, देश आणि धर्माच्या रक्षण, संवधर्नाचा ध्यास त्यांनी घेतला आणि त्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेण्यास सुरुवात केली. दिवसाचे 18 तास काम करून जनतेप्रती असलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव ठेवणारा नेता पंतप्रधान म्हणून या देशाला लाभला.
देशाची अर्थव्यवस्था जगभरात पहिल्या पाचमध्ये असावी आणि विकसित देशांनीही भारताकडे आदराने बघावे, हा निर्धार करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी (PM Narendra Modi) पावले टाकण्यास सुरुवात केली. अनेक गोष्टींचे आंतरराष्ट्रीय अवलंबित्व संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जागतिक बाजारपेठेत डॉलरची दादागिरी मोडून रुपयाची कॉलर ताठ केली. त्यामुळे अनेक देशांसोबतचे आर्थिक व्यवहार रुपयांमध्ये करण्याचा मार्ग प्रशस्त झाला. मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा मंत्र दिला आणि तो मोठ्या प्रमाणात यशस्वीसुद्धा केला. भारताकडे केवळ ग्राहक म्हणून न पाहता उत्पादक म्हणूनही पाहिले जावे, हा त्यांचा विचार खर्या अर्थाने नवी दिशा देणारा होता. आज भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर पोहोचवण्याचे स्वप्न मोदीजी बागळून आहेत. परदेशी कंपन्यांना भारताकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बघावे यासाठी रस्ते, वीज, पाणी, दळणवळणाचे जाळे भक्कम करण्यावर त्यांनी भर दिला. जीएसटीच्या माध्यमातून 'एक देश, एक कर' या योजनेची अंमलबजावणी केली. 'इझ ऑफ डुइंग बिझनेस' हाही याच प्रयत्नांचा भाग होता.
आजवर गरीब, पीडित असलेल्या समाजाच्या आयुष्यात बदल घडवण्याचे व्रत मोदीजींनी अंगिकारले. तरुणांचा देश असे बिरूद मिरवणार्या या भारतातील युवावर्गाला आशेचा नवा किरण दाखवला. 'स्टार्ट अप इंडिया', 'स्कील इंडिया', 'कौशल्य विकास', 'मेक इन इंडिया'सारख्या योजनेतून तरुणांना उद्योजक म्हणून घडवण्याची सुरुवात करण्यात आली. नव्या शैक्षणिक धोरणातून शिक्षणाला नवे आयाम देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 'स्वच्छ भारत अभियाना'च्या माध्यमातून देशवासीयांना स्वच्छतेचा मंत्र दिला. महात्मा गांधी यांना आदर्श मानणार्या मोदीजींनी प्रसंगी स्वत: झाडू हाती घेऊन देशवासीयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. अत्यंत मूलभूत सुविधा असलेल्या शौचालयांसारख्या सुविधाही येथील नागरिकांना मिळत नव्हत्या. त्यामुळे सत्तेवर येताच मोदीजींनी स्वच्छतेचा जागर करत देशभरातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागांत लाखो शौचालयांची उभारणी करण्यात आली.
सरकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांना मिळावा आणि या योजनेच्या अंमलबजावणीतील भ्रष्टाचार संपून सुसूत्रता यावी, यासाठी मोदीजींनी 'प्रधानमंत्री जन-धन योजने'ची सुरुवात केली. देशातील शेतकरी, गरीब, महिला यांचे बँकेत खाते असावे आणि सरकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या खात्यात जमा व्हावा, या उद्देशातून त्यांनी उचललेले हे पाऊल होते. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम आज देशभरात दिसत असून योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत. त्यातून भ्रष्टाचाराला लगाम लागला आहे. वर्षानुवर्षे चुलीचा धूर श्वासोच्छ्वासातून शरीरात गेल्याने अनेक महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत होता. हीच बाब लक्षात घेऊन महिलांचे आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला. त्यातूनच प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेची सुरुवात झाली. या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना गॅस सिलिंडर देण्यात आले. चुलीच्या धुरापासून या महिलांची मुक्तता तर झालीच; पण कामाला वेग आल्याने हाती मोकळा वेळ मिळू लागला. (PM Narendra Modi)
कृषी सिंचन योजना, पीक विमा योजना, कृषी सन्मान योजना यांच्या माध्यमातून देशातील अर्थव्यवस्थेचा सर्वाधिक वाटा उचलणार्या शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने मोदीजींनी पावले टाकली. या देशातील प्रत्येक नागरिक हा सुखी, समाधानी झाला पाहिजे या उद्देशाने त्यांनी काम सुरू केले. शेतकर्यांना मार्गदर्शन, रसायनेविरहित शेती, उत्तम वाणाची उपलब्धता अशा विविध पातळ्यांवर त्यांनी प्रयत्न केले. फाईव्ह एफ म्हणजेच फार्म टू फॅब्रिकचा मंत्र त्यांनी दिला. शेतकर्यांबरोबरच गरिबांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यासाठी गरीब नागरिकांना गरीब कल्याण योजनेचा आधार देण्यात आला. त्यांच्या घरांचे स्वप्न साकारण्यासाठी आवास योजनाही राबवण्यात आली. 'डिजिटल इंडिया', 'नमामि गंगे', 'बेटी बचाओ बेटी पढाओ', 'सर्व शिक्षा अभियान', 'सुकन्या' यांसारखे अनेक उपक्रम हे त्यांच्या दूरदर्शीपणाचे दाखले ठरले आहेत. जाज्वल्य राष्ट्राभिमानातून 'मेरी माटी, मेरा देश', 'हर घर तिरंगा' यांसारख्या संकल्पना देशभरात रुजवल्या. (PM Narendra Modi)
आजच्या काळात सामान्य माणसाचे मन ओळखणारा पंतप्रधान मोदीजींसारखा दुसरा एकही नेता राष्ट्रीय स्तरावर नाही. मोदीजींनीही गेल्या नऊ वर्षांत आपल्या कामगिरीने लोकमान्यता मिळवली आहे. त्यांच्यामुळे आज परदेशातही भारताचे नाव सन्मानाने घेतले जाते. 2001 मध्ये ते सर्वप्रथम गुजरातचे मुख्यमंत्री बनले. तेव्हापासूनचा त्यांचा प्रवास केवळ थक्क करणारा आहे. नरेंद्र मोदीजी हे एक 'लोकनेते' आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांना लोकांमध्ये राहायला, त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला आणि त्यांची दु:खे दूर करण्यात समाधान मिळते. समर्पणाची ही भावना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून देण्यात आलेले धडे आचरणात आणणारे या देशाचे लाडके आणि जगात दबदबा निर्माण करणारे नरेंद्र मोदी. (PM Narendra Modi) वारशाने नव्हे तर कर्तृत्वाने राजकारणात स्वत:ला सिद्ध करून देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा ध्यास त्यांनी घेतला.
जनतेने त्यांच्या नेतृत्वावर भरभरून विश्वास आणि प्रेम दर्शवले. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणार्या मंडळींचा प्रवास तुलनेने सोपा असतो. स्वकर्तृत्वाने लोकमान्य नेतृत्व सिद्ध करणे कठीण असते. मोदीजी यांचे आयुष्य म्हणूनच अनेकांसाठी आदर्शवत आहे.
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींप्रमाणेच नरेंद्र मोदींनाही लेखनाची आवड आहे. त्यांनी कविताही केल्या असून त्यांचा 'आंख आ धन्य छे' या नावाचा एक कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. यातील कविता गुजराती भाषेत आहेत. त्यांची भाषा समजायला खूप सोपी आणि साधी आहे. गुजराती भाषेत असूनही आपल्याला ती सहज कळू शकते. एका कवितेत ते म्हणतात,
'मने सदा गौरव छे के मानव छुं अने हिंदू छुं,
पळ पळ एवुं अनुभवु, के विशाळ, विराट, सिंधू छुं'
धाडस, करुणा आणि आत्मविश्वासाची मूर्ती असे त्यांचे वर्णन करावे लागेल. वर्तमानात राहून भविष्याचा वेध घेणारे त्यांचे नेतृत्व आहे. भारत देशाचे नवनिर्माण करण्याच्या तसेच त्याला जगासाठी आदर्श बनविण्याच्या विश्वासापोटीच भारतीयांनी त्यांना या पदावर बसवलेले आहे. मी त्यांना दीर्घायुरारोग्य चिंतितो.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मा. नरेंद्र मोदीजी यांच्यावर प्रेम होते. या दोघांच्या आशीर्वादानेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काम करण्याची संधी मला मिळाली. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय. महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांबाबत त्यांच्याशी होणारी चर्चा हे माझे सौभाग्यच आहे. महाराष्ट्रात एखाद्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येण्याची मी त्यांना जेव्हा जेव्हा विनंती केली, तेव्हा तेव्हा त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते एखाद्या कामाचा शुभारंभ झाला की, ते काम जलद गतीने पूर्ण होते, असा माझा अनुभव आहे. महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन आणि पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मोदीजींच्याच हस्ते झाले. मुंबई मेट्रो दोनचे उद्घाटन आणि लोकार्पणही मोदीजींच्याच हस्ते झाले.
महाराष्ट्रापुरता विचार केला तरी आपल्या लक्षात येईल की, 2014 पूर्वीच्या दोन दशकांत जेवढी कामे झाली, त्याच्या शेकडो पट कामे गेल्या नऊ वर्षांत केंद्राच्या मदतीने झाली आहेत. पायाभूत सुविधांची अनेक कामे सध्या राज्यात सुरू आहेत.
गेल्या नऊ वर्षांत मोदी सरकारने महाराष्ट्राला दोन लाख 90 हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले आणि कर परताव्यापोटी तब्बल चार लाख कोटी रुपये आतापर्यंत अदा केले. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा केंद्राचा डाव आहे वगैरेसारखी शेरेबाजी कोणतीही माहिती नसताना विरोधक करतात तेव्हा हसू येते. या ठिकाणी मी खर्चाची काही थेट आकडेवारीच देतो. (PM Narendra Modi)
प्रधानमंत्री आवास योजनेत 25 लाख घरे बांधली गेली आहेत. आयुष्मान भारत योजनेचा फायदा 71 लाख गरिबांना झाला. महाराष्ट्राला 17.19 कोटी कोव्हिड लसी पुरवल्या गेल्या. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत 1 कोटी 10 लाख शेतकर्यांना लाभ झाला आहे. जलजीवन मिशन योजाना राबवून सव्वा कोटी घरांमध्ये नळजोडणी झाली. उज्ज्वला योजनेत 38.90 लाख भगिनींना स्वस्त सिलिंडर्स दिले गेले. कौशल्य विकास योजनेचा फायदा 10 लाख 27 हजार युवकांना झाला. प्रधानमंत्री पीक विमा योजना हे तर ऐतिहासिक पाऊल होते. प्रत्येकी केवळ एक रुपयात सव्वा कोटी शेतकर्यांचा पीक विमा काढण्यात आला.
पंतप्रधान स्वनिधी योजनेद्वारे 5 लाखांपेक्षा जास्त पदपथ व्यावसायिकांना त्यांच्या पायावर उभे होण्यास मदत झाली. मुद्रा योजनेतून 41 लाख युवकांना लाभ होऊन त्यांचे व्यवसाय मार्गी लागले. अटल पेन्शन योजनेमुळे 40 लाख ज्येष्ठांचे आयुष्य सुसह्य झाले. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ 23 लाख 13 हजार लोकांना झाला. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतून 50 लाख 600 लोकांना तर प्रधानमंत्री मातृवंदन योजनेतून 32 लाख 25 हजार नागरिकांना मदत झाली. त्यांचे आयुष्य मार्गी लागले. सुखी झाले. गेल्या सव्वा वर्षांत राज्यातील विकासासाठी केंद्र सरकारने भरभरून मदत केली आहे. आम्ही कोणतीही योजना किंवा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मांडल्यानंतर कायम सकारात्मक प्रतिसादच मिळाला आहे. मग, ते साखर कारखान्यांच्या 10 हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफ करण्याचा विषय असो किंवा राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी भरभरून आर्थिक मदत असो, पायाभूत सुविधा प्रकल्पांना अर्थसहाय्य असो किंवा राज्यातील जनतेचा प्रवास सुखकर करणार्या वंदे भारत गाड्या असो…
महाराष्ट्राला आजवर केंद्र सरकारकडून एवढी भरभरून मदत कधीही झाली नसावी. माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत ही ऐतिहासिक कामगिरी होतेय, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्राला आणि वैयक्तिकरीत्या मलाही मोदीजींचा स्नेह लाभतोय. जेव्हा मोदीजी मला भेटतात, तेव्हा ते माझ्या पाठीवर कायम कौतुकाची थाप मारतात. पुढील वाटचालीसाठी मला प्रेरणा आणि भरभरून आशीर्वादही देतात. मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत केलेल्या माझ्या भाषणाचेही त्यांनी कौतुक केले आणि इर्शाळगडावरील दुर्घटनेनंतर मी तिथे दिलेल्या भेटीबाबतही त्यांनी आस्थेने विचारपूस केली. दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत त्यांनी मला मानाचे स्थान दिले. मोदीजींनी मला सहकुटुंब आपल्या घरी आमंत्रित केले होते. आपल्या शेजारच्या खुर्चीवर त्यांनी माझ्या वडिलांना बसवणे, हा मुलगा म्हणून माझ्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण होता. माझ्या नातवाचेही त्यांनी लाड केले. त्यामुळे तोसुद्धा मोदीजींचा (PM Narendra Modi) फॅन झाला आहे. ते जेवढे कणखर आहेत तेवढेच हळवे आहेत, याची प्रचिती मला आली.
एक व्यक्ती म्हणून, एक पंतप्रधान म्हणून मोदीजींचे (PM Narendra Modi) कार्य अतुलनीय आहे. परंतु, त्यामुळेच अनेकांना पोटदुखी झाली आहे. मोदीजींना टीकेचे वार झेलावे लागले, द्वेषाच्या राजकारणाचा सामना करावा लागला तेवढा स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजवर कोणालाही करावा लागला नसेल. पंतप्रधानांनी संसदेत या सर्व आरोपांना, टीकेला परखड शब्दांत उत्तरे दिली, परंतु कधीही संयम सोडला नाही. जाहीर विधाने करतानाही सभ्यता आणि सूसंस्कृतपणाला कधी रजा दिली नाही. ते शांतपणे आपले काम करत राहिले. एवढे स्थितप्रज्ञ कसे राहता येते, असे मी एकदा मोदीजींना धीर करून विचारले होते. त्यावर ते मला म्हणाले होते, एकदा तुमचे ध्येय निश्चित केले की ते साध्य होत नाही, तोपर्यंत त्या दिशेने वाटचाल करत राहा. तुमच्या वाटेत अनेक अडथळे येतील. विघ्न येतील. पण, त्यामुळे विचलित होऊ नका… आपले ध्येय विसरू नका… मोदीजींचा हा सल्ला मीसुद्धा आचरणात आणण्याचा प्रयत्न माझ्या परीने करतोय.
2014 मध्ये सत्तेत येताना भाजपने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचे, महिलांसाठी अन्यायकारक असलेला ट्रिपल तलाक संपुष्टात आणण्याचे आणि अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या उभारणीचे वचन मोदी यांनी दिले होते. नऊ वर्षांच्या काळामध्ये त्यांनी ही सारे वचने म्हणजे आजवरच्या अनुभवानुसार निवडणुकीचा जुमला नसून ती पूर्ण करण्यासाठीच दिली होती, हे दाखवून दिले. मोदीजींनी 'मंदिर वही बनाया और तारीख भी अब बता दी है…'
प्रभू श्रीरामांच्याच नगरीमध्ये आजवर वनवास भोगत असलेल्या रामरायाचे भव्यदिव्य मंदिर उभे राहावे, यासाठी देशातील नागरिकांनी स्वप्न पाहिले होते. अनेकांनी संघर्ष केला. कायदेशीर लढा दिला. कारसेवक, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, मा. लालकृष्ण अडवाणीजी, स्व. अटलबिहारी वाजपेयीजी, मुरली मनोहर जोशीजी यांसारख्या अनेक नेतेमंडळींनी श्रीरामाचे मंदिर उभारण्याचे ध्यास घेतला होता. या सार्यांचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केला होता. आज अयोध्येत भव्य दिव्य असे श्रीरामाचे मंदिर उभे राहिले आहे. देशातील प्रत्येक कडव्या हिंदू नागरिकाला जिथे माथा टेकवण्याची मनीषा होती, त्या श्रीरामाचरणी लीन होता येणार आहे. जगाला हेवा वाटावा अशा मंदिराची निर्मिती अयोध्येत, श्रीरामाच्या जन्मभूमीत होत आहे. प्रभू रामाच्या मंदिराबरोबरच 'सेंट्रल व्हिस्टा' या नव्या संसद भवनाची उभारणीही अशीच मोलाची ठरली. भविष्यातील लोकसंख्यावाढ आणि त्यातुलनेत वाढणारी लोकप्रतिनिधींची संख्या लक्षात घेऊन नव्या संसद उभारणीला त्यांनी चालना दिली. आज भव्य- दिव्य असे नवे संसदभवन दिमाखात उभे आहे. पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांचा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगाला हेवा वाटेल, असा पुतळा उभारला.
विरोधकांचा टोकाचा विरोध असणार ही बाब लक्षात घेऊन काश्मिरातील कलम 370 हटवून विकासाला मोकळी वाट करून देण्याचा निर्धार त्यांनी केला. नागरिकांचा या निर्णयाला पाठिंबा मिळणार, याची त्यांना खात्री होती. त्यामुळेच समाजकंटक आणि विघ्नसंतोषी मंडळींना रोखून कलम 370 हटवण्याचा निर्णय संमत करण्यात आला. देशाचे धडाडीचे गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या नेतृत्वाखाली या निर्णयाची तातडीने आणि यशस्वी अंमलबजावणीही झाली. स्वातंत्र्यावेळी करण्यात आलेल्या 'चुका' मोदीजी यांच्या नेतृत्वात अखेर सुधारण्यात आल्या. महिलांना गुलामगिरीत अडकवणारा आणि एका क्षणात आयुष्य होत्याचे नव्हते करणारा 'ट्रिपल तलाक' हा मोदीजींनी कायद्याने संपुष्टात आणला. महिलांना मोकळेपणाने जगता यावे, बंधनांचे जोखड झुगारता यावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
आपल्या देशाकडे वाकड्या नजरेन पाहणार्या शत्रूंना धडा शिकवण्यासाठी तेवढीच जबर इच्छाशक्ती असावी लागते. त्यामुळे मोदीजी यांनी थेट पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक घडवला आणि शत्रूराष्ट्रांना भारत आता सहन करणारा नाही तर प्रसंगी प्रत्युत्तर देणारा देश आहे, याची जाणीव करून दिली. तसेच पाकिस्तानच्या कुरापतींचे उद्योग संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडून जगभराचे लक्ष दहशतवादाच्या प्रवृत्तीकडे वळवले.
जागतिक व्यासपीठावर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची खरी क्षमता आणि भूमिका केवळ मोदीजींमुळेच समोर येऊ शकली. त्यांना विश्वगुरू संबोधले जाऊ लागले. अमेरिका, फ्रान्स, इटली अशा अनेक देशांचे नेते मोदीजींच्या मताला आज महत्त्व देऊ लागले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी केलेल्या भाषणाची जगभरात प्रशंसा झाली. ब्रिक्स, सार्क आणि जी-20 या शिखर परिषदांमधून मोदीजी यांचे जागतिक नेतृत्व आज प्रकर्षाने उजळले जात आहे. विविध जागतिक, आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवरील भारताच्या भूमिकेची आणि मतांची दखल घेतली जात आहे. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्याच्या नरेंद्र मोदीजींच्या आवाहनाला संयुक्त राष्ट्र परिषदेत जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
विकसनशील देश म्हणून भारताकडे कायम ग्राहक म्हणून पाहणारे विकसित देश ते अगदी परवा भारतात झालेल्या जी-20 देशांच्या बैठकीचे यजमानपद पेलणारा, विकसित देशांच्या प्रतिनिधींचे आदरातिथ्य आणि बरोबरीने विचारमंथन करणारा देश असा नऊ वर्षांत बदलाचा मोठा टप्पा भारताने गाठला, कारण या देशाचे नेतृत्व मोदीजींच्या हाती आहे. देशातील उच्चवर्गीय मंडळी म्हणजे देश नव्हे. तर तळागाळातील नागरिक, मातीत राबणारा शेतकरी, कष्टाची भाकरी खाणारा कष्टकरी, मध्यमवर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, लहान मुले आणि सर्व आर्थिक स्तरावरील मंडळींचा हा देश आहे. त्यामुळेच हा देश म्हणजे जगभरातील नागरिकांना एका ठरावीक वर्गाचा चेहरा दाखवणारा हा 'इंडिया' नसून सर्वसमावेशक 'भारत' आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.
इंग्रजांना या देशातून जाऊन आता 75 वर्षे होऊन गेली आहेत. गुलामगिरीच्या एक एक खुणा संपवत जाणे हे आपले कर्तव्य आहे, हा संदेश ठामपणे पोहोचवणारेही मोदीजीच. त्यांचा करिश्मा, विचार-आचाराचे गारूड जगभरात असल्याचे चित्र आज सर्वदूर दिसून येते.
जी-20 परिषदेच्या निमित्ताने जगाच्या विविध देशांचे प्रमुख दिल्लीमध्ये आले होते. नरेंद्र मोदीजींनी भारताची कीर्ती जगभर पोहोचवली आणि देशाला महासत्ता बनविण्यासाठी ते घेत असलेल्या अविरत परिश्रमाचे हे फळ होते. अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, यूएईसह अनेक बलाढ्य राष्ट्रांचे प्रमुख दिल्लीत आले होते. या शिखर परिषदेत सर्वाधिक राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. केवळ मोदीजींच्या करिश्म्यामुळे हे शक्य झाले. एकमताने आणि एक भावनेने एकत्र येऊन अधिक समृद्ध आणि सुसंवादी भविष्यासाठी काम करण्याचे वचन पंतप्रधानांनी यावेळी दिले. या शिखर परिषदेत पंतप्रधानांनी मांडलेला 'दिल्ली जाहीरनामा' एकमताने स्वीकारण्यात आला. भारत मोदीजींनी यशस्वी केलेला सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास हा मंत्र जगाने स्वीकारला आहे. जी-20 समूहाने टाळ्या आणि बाके वाजवून त्याचे स्वागत केले. हे आपले मोठे राजनैतिक यश आहे. भारत-मध्यपूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडोरचा दूरदर्शी ठरावही या संमेलनात करण्यात आला. या निर्णयामुळे देशाचा आर्थिक महासत्तेच्या दिशेने प्रवास अधिक सुकर होणार आहे. आजवर आफ्रिकेतील देशांना जी-20मध्ये प्रतिनिधित्व नव्हते. परंतु, मोदीजींच्या पुढाकारामुळे हे देशही आता जी-20 परिषदेचे सभासद झाले आहेत.
'वसुधैव कुटुंबकम' ही संकल्पना घेऊन भारताने जी-20 परिषदेचे यजमानपद स्वीकारले आणि यशस्वी आयोजनही केले. या राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदाचा सन्मान पंतप्रधान मोदीजींच्या रूपाने भारताला प्रथमच मिळाला, ही देशवासीयांसाठी अतिशय गर्वाची गोष्ट आहे. या शिखर परिषदेच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि 'भारत' यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. हे देशाच्या इतिहासातील सोनेरी पान आहे.
अमेरिका, रशिया, ब्रिटन, युरोप, यूएईपासून अनेक छोट्या मोठ्या देशांचे प्रतिनिधी मोदीजींना मित्र, गुरू, मार्गदर्शक मानतात. भारताच्या विकासाचे श्रेय मोदीजी यांना देतात. जगाचे नेतृत्व भारताने करावे, अशी अपेक्षा बाळगतात, हे मोदीजींच्या नऊ वर्षांच्या प्रयत्नांचे यश आहे. नऊ वर्षांत मोदीजींची परराष्ट्रनीती आणि मुत्सद्देगिरीने भारताना जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून दिले. अमेरिका, ब्रिटन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष मोदीजींची मैत्री मोलाची मानतात, त्यांना फ्रेंड, बॉस संबोधतात ही बाब आता जगाने नोंदवली आहे. फ्रान्स आणि आखाती देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने मोदीजींचा गौरव केला. पापा न्यू गिनियाच्या पंतप्रधानांनी तर आदराने मोदींना वाकून नमस्कारही केला. मोदीजींची परदेशात प्रचंड क्रेझ आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी मी जेव्हा दावोस येथे गेलो होतो, तेव्हा लक्झेम्बर्गच्या पंतप्रधान मला म्हणाले, मी मोदी भक्त आहे. अनेक देशांच्या प्रमुखांनी तिथे मोदींजीची दिलखुलास स्तुती करत होते. भारतीय म्हणून माझ्यासाठी ते अत्यंत अभिमानाचा क्षण होते.
युद्ध नव्हे बुद्ध हवा, शांतीचा मार्ग हवा हा गांधीजी आणि गौतम बुद्धांचा विचार जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न मोदीजी करत आहेत. त्यासाठी दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जागतिक पातळीवर देशांचे पाठबळ मिळवून 'मेक इन इंडिया'साठी ते संधी उपलब्ध करत आहेत. कोरोनाकाळ हा सर्व देशांसाठी, जगासाठी परीक्षेचा होता. मात्र, याही काळात औषधे, मदत आणि लसीची उपलब्धता करून इतर देशांना सहाय्याचा हात पुढे करण्यासाठी 'वसुधैव कुटुंबकम' ही भावना ठायी असावी लागते. मोदीजी यांचा या तत्त्वावर विश्वास असल्याने त्यांनी मानवतेच्या द़ृष्टिकोनातून अनेकांना मदतीचा हात दिला. कोव्हिडचा मुकाबला करण्यासाठी जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात यशस्वी करूनच ते थांबले नाहीत तर 'व्हॅक्सिन मैत्री' या योजनेअंतर्गत 101 देशांना 23 कोटी लशींचा लस पुरवठा केला. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका अशा विविध देशांमध्ये मोदीजींच्या भेटीवेळी असणारी उत्सुकता, नागरिकांची होणारी गर्दी आणि सकारात्मक बदलाची खात्री ही मोदीजींच्या विश्वगुरू असण्यावर शिक्कामोर्तब करत आहे. मोदीजींच्या पाठोपाठ परदेशात दौरे करून काही मंडळी आपला करिश्मा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण डबक्यात पोहोणार्यांना समुद्राचा अंदाज नसतो. त्यासाठी राजकीय जीवनाचा निर्णय वारशाने नव्हे, तर क्षमतेतून होण्याची गरज असते. महाराष्ट्र, देशातील विरोधकांना हे कधी कळणार?
हे ही वाचा :