पुढारी ऑनलाईन: भारताने पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखाली G20 परिषदेचे अध्यक्षपद १ डिसेंबरपासून स्वीकारले. यानंतर भारताचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत जागतिक स्तरावर सर्वसमावेशक, महत्त्वकांक्षी, कृती केंद्रित आणि निर्णायक अजेंड्यावर आधारित कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जगात शाश्वत शांतता नांदण्यासाठी माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व देशात एकजूट करतील असा विश्वास असल्याचे त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मोदी यांच्या ट्विटवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी देखील या कारकिर्दित मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार असल्याचे म्हटले. त्यानंतर आता फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मोदींसोबतचा एक फोटो ट्विट करत नरेंद्र मोदींना माझे मित्र असून, त्यांच्यावर विश्वास असल्याचे म्हटले आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलिगंन देतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत मॅक्रॉन यांनी म्हटले आहे की, "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' यासाठी भारताने G20 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे! माझे मित्र नरेंद्र मोदी आम्हाला सर्वाना एकत्र आणतील. तसेच ते शांतता आणि अधिक शाश्वत जग निर्माण करतील यावर माझा विश्वास आहे'. असे देखील त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत हा अमेरिकेचा मजबूत भागीदार असणारा देश आहे. त्यामुळे G20 च्या भारताकडील अध्यक्षपदादरम्यान माझे मित्र पंतप्रधान मोदी यांना मी पाठिंबा देण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हवामान, ऊर्जा आणि अन्न संकट यांसारख्या समस्यांमधील आव्हानांचा आम्ही एकत्रित सामना करू आणि सर्वसमावेशक, शाश्वत विकास वाढीसाठी प्रयत्न करू असे देखील बायडेन यांनी सांगितले आहे.