Latest

G20 summit | पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार ऋषी सुनक यांची भेट, तारीख, ठिकाण ठरलं?

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात बाली येथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या (G20 summit) दरम्यान ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान ऋषी सुनक आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेऊ शकतात. ब्रिटनसोबत लवकरच एफटीए अर्थात मुक्त व्यापार करार (FTA) करणे आणि फ्रान्ससोबत द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी वाढवण्याचा भारताचा विचार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची या दोन नेत्यांसोबतची भेट महत्वाची मानली जात आहे.

पंतप्रधान मोदी १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान बाली दौऱ्यावर जाणार आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानांशी त्यांची होणारी भेट ही पहिली वैयक्तिक भेट असेल. मूळ भारतीय वंशाचे असलेले ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांची आणि पंतप्रधान मोदी यांची फोनवर चर्चा झाली होती. पंतप्रधान मोदींनी सुनक यांना ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या होत्या. मोदी आणि सुनक यांच्या भेटीत भारत आणि ब्रिटन दरम्यान द्विपक्षीय चर्चेत एफटीए वाटाघाटी हा मुख्य अजेंडा असेल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

तसेच पीएम मोदी यांचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी चांगले संबंध आहेत. यामुळे बाली येथे होणाऱ्या नियोजित बैठकीत द्विपक्षीय धोरणात्मक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. फ्रान्सने नुकतेच त्यांचे राष्ट्रीय धोरणात्मक पुनरावलोकन २०२२ (National Strategic Review 2022) जारी केले आहे आणि भारत त्याच्या अजेंडाच्या शीर्षस्थानी आहे.

पंतप्रधान मोदी सुरीनामचे राष्ट्रपती आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांचीही भेट घेणार आहेत. १७ वी G20 शिखर परिषद १५ ते १६ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. सध्याच्या जागतिक संकटावर उपाय शोधण्यासाठी ही शिखर परिषद जागतिक नेत्यांना एकत्र आणणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन देखील बाली दौऱ्यावर येणार आहेत.

गेल्या आठवड्यात पीएम मोदींनी G20 summit अध्यक्षपदाचा लोगो आणि थीम लाँच केले होते. या लोगोत वसुधैव कुटुंबकम हे ब्रीदवाक्य आणि कमळ आहे. जी-२० राष्ट्रगटाचे अध्यक्षपद भारताकडे येत आहे. G20 मध्ये भारतासह अमेरिका, चीन, फ्रान्स, जर्मनी, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, इटली, दक्षिण कोरिया, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन आदी १९ देशांचा समावेश आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT