पणजी : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयातर्फे पणजी येथील कांपाल परिसरामध्ये आयोजित चार दिवसीय ९ व्या जागतिक आयुर्वेदिक परिषद आणि प्रदर्शनाला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान, उद्या दिनांक ११ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कांपाल येथे आयुर्वेदिक परिषदेच्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तेथूनच ते धारगळ येथे स्थापन करण्यात आलेल्या आयुष इस्पितळ तसेच देशातील दोन अन्य आयुर्वेदिक संस्थांचे उद्घाटन व्हर्च्युअल पद्धतीने उदघाटन करतील. त्यानंतर ते मोपा येथे जाऊन मोपा विमानतळाचे उद्घाटन करून दिल्लीला रवाना होणार आहेत. पंतप्रधानांच्या आगमनासाठी आणि सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
जुन्या बांदोडकर मैदानावर आयोजित या प्रदर्शनासाठी मोठ दोन मोठे तंबू उभारण्यात आलेले असून सुमारे विविध कंपन्यांचे ४०० स्टॉल्स येथे लावण्यात आलेले आहेत. स्टॉलवर मोठ्या प्रमाणात नागरिकांसह विद्यार्थ्यांची आणि या प्रदर्शनासाठी आलेल्या ५००० प्रतिनिधींची मोठी गर्दी उसळलेली हाेती. त्याचबरोबर या सर्व सुमारे ५ हजार प्रतिनिधींसाठी जेवणाची सोय आयोजकांतर्फे करण्यात आलेली असल्यामुळे जेवणासाठी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र येथे दिसून येत आहे.
.हेही वाचा