पुढारी ऑनलाइन डेस्क : घराणेशाही, भ्रष्टाचार, युवकांना लुटणारे राजकीय पक्ष 'रेट कार्ड' मार्गावर चालतात. या पक्षांपासून युवकांच्या भविष्याला 'सेफ गार्ड' करण्यासाठी सरकार तत्पर आहे, असे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'रोजगार मेळाव्या'तून विरोधकांवर निशाणा साधला. व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून देशभरातील ४३ ठिकाणी आयोजित मेळाव्याला संबोधित करताना सरकार युवकांच्या संकल्पांना साकार करण्याचे काम करीत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. 'रेट कार्ड' युवकांच्या स्वप्नांचा चुराडा करणारे आहे. त्यामुळे युवकांसह त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छा,आकांक्षांना 'सेफ गार्ड' करण्याचे काम सरकार करीत असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
रोजगार मेळाव्यातून सरकारी विभाग, संघटनांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या ७० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करतांना पंतप्रधान म्हणाले की,रोजगार मेळावे एनडीए तसेच भाजप सरकारची नवीन ओळख बनली आहे. भाजप शासित सरकार सातत्याने अशाप्रकारे रोजगार मेळावे आयोजित करीत आहे. सरकारी नोकरीत शामिल होणाऱ्यांसाठी हा एक महत्वपूर्ण काळ आहे. येत्या २५ वर्षांत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य आपल्यासमोर आहे,असे पंतप्रधान म्हणाले.
पुढे बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, मुद्रा योजनेमुळे कोट्यवधी युवकांना मदत मिळत आहे. 'स्टार्ट अप इंडिया' तसेच 'स्टॅन्ड अप इंडिया' सारख्या अभियानामुळे युवकांना सामर्थ आणखी वाढले आहे. सरकारकडून मदत देऊ करण्यात आलेले तरुण आता स्व:त अनेक युवकांना नोकरी देत आहेत.आज संपूर्ण जग भारताच्या विकास यात्रेत सहयात्री म्हणून प्रवास करण्यास तत्पर आहे. भारतासंबंधी विश्वास आणि आमच्या अर्थव्यवस्थेवर यापूर्वी एवढा विश्वास कधीही नव्हता. अनेक अडचणींनंतर भारताने आपली अर्थव्यवस्था एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहे. जगातील बड्या कंपन्यांनी उत्पादनासाठी भारतात येत असल्याचा दावा देखील पंतप्रधानांनी केला.
गेल्या एक दशकापासून भारत पूर्वीच्या तुलनेत अधिक स्थिर, सुरक्षित आणि बळकट झाला आहे.राजकीय भ्रष्टाचार, योजनांमध्ये अनियमितता आणि जनतेच्या धनाचा दुरूपयोग अशीच ओळख जुन्या सरकारची बनली होती. पंरतु, आज भारताची ओळख सरकारचे निर्णायक निर्णय ठरत आहे.आर्थिक तसेच प्रगतिशील सामाजिक सुधारणा हीच ओळख बनली आहे.
जल जीवन मिशन वर ४ लाख कोटी रुपये खर्च केले जात आहे. मिशन सुरू होण्यापूर्वी ग्रामीण भागातील १०० पैकी केवळ १५ घरांनाच नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. पंरतु,आता या मिशनच्या माध्यमातून १०० पैकी ६२ घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. देशातील १३० जिल्ह्यांमध्ये सर्व गावांतील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
हे ही वाचा :