पौड : पुढारी वृत्तसेवा
गुंगीचे औषध देत पाळीव प्राण्यांना मारून अवयवांची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुळशी धरण भागातील नांदगाव, देवघर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी धरण भागातील नागरिकांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्यादी नोंदवल्या आहेत.
समाजकंटकांना अटक करून हा प्रकार रोखण्याची मागणी केली आहे. मागील काही दिवसांपासून आंबवणे ग्रामपंचायत हद्दीत समाजकंटकांद्वारे गाय व बैलांना गुंगीचे औषध देत ठार मारले जात आहे. त्यानंतर या मृत जनावरांचे अवयव कापून नेले जात आहेत. गेल्या काही दिवसात अशा प्रकारच्या ७ ते ८ घटना घडल्या आहेत, त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
दि. ७ सप्टेंबर रोजी देखील अशीच एक घटना नांदगाव येथे घडली. अनंता वाळंज यांच्या बैलाला मारून त्याचे अवयव काढून नेण्यात आले आहेत. याबाबतचे पुरावे देखील पौड पोलिसांना देण्यात आले आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून याबाबतचा तपास लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांना केली.