वर्षा कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मुलांना विद्यार्थिदशेतच कचरा न करण्याचे आणि त्यांची विल्हेवाट लावण्याचे संस्कार देण्यात येत आहेत. यासाठी मनपाच्या 17 शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून, या शाळा शून्य कचरा घोषित करण्यात आल्या आहेत.
सुरुवातीला महापालिकेच्या सोनावणे वस्ती शाळेमध्ये सुरुवातीला हा उपक्रम राबविण्यात आला. आसरा सोशल फाउंंडेशनच्या मदतीने शून्य कचरा मोहिमेतून मुलांपर्यंत हे संस्कार पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. लहानपणासूनच मुलांना हे संस्कार रुजवले तर त्याचा नक्कीच फायदा होईल या विचारातून हे वर्ग सुरु केले आहे. सध्या 17 शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. (Latest Pimpri News)
आपण अनेक गोष्टींचे संस्कार मुलांना लहान वयात देतो. सध्या मुलांमध्ये संस्कार शिबिरे आणि संस्कार वर्गातून मुलांना अनेक विषयांवर संस्कार देण्याचे काम केले जाते. याबरोबरच मुलांना शून्य कचरा यासाठी संस्कार देण्याचा विचार पुढे आला. कचरा वस्तू आहे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावली तर कचरापेट्यांची आवश्यकता पडत नाही. यासाठी मुलांना ओला व सुका कचर्याचे नियोजन कसे करावे हे शिकविले जाते. डब्यातील उरलेले अन्न पक्ष्यांसाठी दिले जाते तर चॉकलेट, बिस्किट आदींचे रॅपर जमा करून प्लॅस्टिक पुनर्वापर करणार्या संस्थेला दिले जाते.
शून्य कचरा संस्कार वर्गाचे काम
कचर्याचे ओला, सुका आणि घातक असे वर्गीकरण करण्यात येते. हिरवा चारा व कंपोस्ट निर्मिती केली जाते. कुजणारा कचरा कंपोस्ट खत निर्मिती टाकीमध्ये जमा होतो. यामध्ये वर्गीकरणानंतर सुका कचरा (न कुजणारा- प्लास्टिक, भंगार, कागद, काच) जमा करून नवनिर्मिती केली जाते भंगार विकून मोबदल्यात रोपांची खरेदी केली जाते. मिशन शुन्य कचरा यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
त्यासाठी पोस्टर प्रदर्शन, घोषवाक्य, जाणीव जागृतीसाठी तासिका घेऊन संस्कार वर्ग चालू आहे. प्लास्टिक मुक्त कचर्यासाठी महिनाभर प्लॅस्टिक गोळा करायचे नंतर ते पुनर्वापर करणार्या संस्थेला विकले जाते. 2021 पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सुका कचरा, ओला कचरा व घातक कचरा वेगळा केला जातो. शाळांमध्ये जो ओला कचरा असतो तो डब्यातील उरलेले अन्न पदार्थ. त्यासाठी चिऊ काऊचा घास उपक्रम राबविण्यात येतो. यामध्ये एका झाडाखाली एक ताट ठेवून त्यामध्ये उरलेले अन्न पक्ष्यांसाठी टाकले जाते.
...या आहेत शाळा
सोनावणे वस्ती शाळा, मनपा केशवनगर शाळा, रावेत शाळा, इंद्रायणीनगर शाळा, मनपा पब्लिक स्कूल मुले 4, चिखली मुले 90, स्व. दत्तोबा रामचंद्र लांडे इंग्रजी प्राथ. शाळा काळेवाडी आकांक्षा, मनपा विकासनगर, मनपा शाळा यशवंतनगर, मनपा शाळा 02, मनपा शाळा मुली 91, नेवाळे वस्ती शाळा 88, रहाटणी मुले शाळा 55, कमला नेहरू शाळा पिंंपरीनगर, बोपखेल शाळा, छत्रपती शिवाजी महाराज इंग्लिश मीडियम कासारवाडी आकांक्षा.