पिंपरी: खगोलशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची आणि कुतूहलजनक घटना असलेल्या शून्य सावली दिवसाच्या निमित्ताने चिंचवड येथील सायन्स पार्क आणि तारांगण येथे शून्य सावलीच्या विशेष निरीक्षण कार्यक्रमाचे बुधवार (दि. 13) आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात विद्यार्थी व विज्ञानप्रेमी नागरिक भर दुपारी सायन्स पार्कच्या प्रांगणात उत्साहाने सहभागी झाले व या खगोलीय घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. पृथ्वीची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा अथवा परिभमण होत असताना उत्तरायण व दक्षिणायनदरम्यान विशिष्ट अक्षांशावर सूर्य बरोबर डोक्यावर येतो.
ज्यामुळे काही क्षणांसाठी पृथ्वीवरील त्या ठिकाणी असलेल्या वस्तूची सावली शून्य होते. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये हा दुर्मिळ योग दि. 13 मे रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी जुळून आला. या निरीक्षण उपक्रमात विज्ञान प्रेमींसाठी थेट प्रात्यक्षिके, माहितीसह सायन्स पार्कच्या प्रांगणात विविध उभे खांब, बॉटल्स व लहान पाईप आदीच्या सहाय्याने त्या वस्तूंवर पडलेली सावली कशाप्रकारे हळूहळू लहान होत जाते.
आणि विशिष्ट वेळी ती काही क्षणांसाठी पूर्णपणे नाहीशी होते, याचा अविस्मरणीय प्रत्यक्ष अनुभव उपस्थितांनी घेतला. तसेच दि. 14 मे रोजीही प्रेक्षकांसाठी अशाच प्रकारच्या निरीक्षण उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
याचबरोबर शुक्रवार (दि. 15) पिंपरी-चिंचवड तारांगणाच्या 3 ऱ्या वर्धापन दिनानिमित्त विशेष खगोलीय कार्यशाळा, मिनी तारांगणातील प्रात्यक्षिके सादर होणार आहेत. तसेच, दि. 17 व 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय संग््राहालय दिवसानिमित्त छंदसमाट सामाजिक संस्था, नागपूर व पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या संयुक्त उपक्रमाने कला व संस्कृतीचे खास प्रदर्शन आयोजित होणार आहे.