...अन् आईने फोडला हंबरडा; अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरीतील तरुणाचा अंत Pudhari
पिंपरी चिंचवड

Ahmedabad Plane Crash: ...अन् आईने फोडला हंबरडा; अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरीतील तरुणाचा अंत

बकरी ईद सणासाठी आला होता घरी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये कोसळलं ! अशी ब्रेकिंग न्यूज टीव्हीवर झळकली. बातमी ऐकताच एका आईच्या काळजात धस्स झाले. धडधडत्या हृदयाने तिने लगेच मुलाला फोन लावला... मात्र, फोन बंद. काहीच प्रतिसाद नाही. काही क्षणातच पिंपरी-चिंचवडमधील संत तुकाराम नगरमध्ये राहणार्‍या आईने टाहो फोडला, माझा इरफान..! आणि घरभर एकच हंबरड्याचे पडसाद घुमले.

अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत 22 वर्षीय इरफान शेख या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडिया कंपनीत कॅबिन क्रू म्हणून काम करणार्‍या इरफानने लंडनला रवाना होण्यापूर्वी आईला शेवटचा फोन केला होता. त्यानंतर काही तासांतच ‘त्या’ आईला टीव्हीवर आपल्या पोराच्या मृत्यूची बातमी ऐकायला मिळाली. (Latest Pimpri News)

इरफान शेख हा पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकाराम नगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता. तो एअर इंडिया एअरलाईन्समध्ये कॅबिन क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता. नुकताच बकरी ईद साजरी करण्यासाठी तो तीन दिवसांची सुटी घेऊन घरी आला होता. आई, भाऊ व नातेवाईकांसोबत त्याने ईद साजरी केली. आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं उरात बाळगून तो पुन्हा ड्युटीवर परतला... मात्र, तीच ड्युटी त्याच्यासाठी अखेरची ठरली.

बकरी ईदच्या दिवशी त्याने आई तस्लीमाला मिठी मारली होती. आई, आता लवकरच मी मोठ्या पदावर काम करेन, असे अभिमानाने त्याने सांगितलं होते. लंडनला जाणार्‍या फ्लाइटसाठी तो अहमदाबाद विमानतळावर पोहोचला होता.

टेक ऑफ होण्यापूर्वी त्याने आईला फोन केला. आई, अजून दहा मिनिटांत विमान उडणार आहे. मी ठीक आहे, असे सांगून तो शांतपणे विमानात बसला होता. मात्र, काही वेळातच इरफानच्या घरच्या टीव्हीवर विमान दुर्घटनेची बातमी झळकली अन् क्षणातच शेख कुटुंबीय शोकसागरात बुडाले.

इरफानचं पार्थिव आणण्यासाठी त्याची आई आणि मोठा भाऊ अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए तपासणी आवश्यक ठरत आहे. त्यामुळे अंतिम ओळख पटेपर्यंत इरफानच्या पार्थिवाचे दहनही लांबणीवर आहे, अशी माहिती त्याचे काका फिरोज शेख यांनी दिली.

काकू.., इरफान आपल्यात नाही..!

टीव्हीवर बातमी पाहून आईने घाईघाईने इरफानला फोन केला, पण फोन बंद होता. तिच्या काळजाचा ठाव सुटला. इरफानच्या मित्रांना फोन केले असता त्यांनी काकू... इरफान आपल्यात नाही, अशी धक्कादायक बातमी सांगितली. त्याच क्षणी तस्लीमाच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर आला. लेकासाठी मोठी स्वप्न पाहणार्‍या आईचे जगच उद्ध्वस्त झाले.

लहानपणापासून विमानात नोकरीचे स्वप्न

विमानात नोकरी करणे हे इरफानचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने मेहनत घेतली होती. लहानपणापासूनच त्याला आकाशात उडणार्‍या विमानांकडे बघून आकर्षण वाटत होते. शेवटी त्याने मोठ्या कष्टाने स्वप्नाला आकार दिला. मात्र, नियतीने ते बघवल नाही. ऐन उमेदीच्या काळात इरफानचा दुर्दैवी मृत्यू झाला.

परिसरात शोककळा

इरफानच्या निधनाने संत तुकारामनगर परिसरात शोककळा पसरली आहे. त्याचे मित्र, शेजारी, नातेवाईक अजूनही या बातमीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. तो खूप हसरा, शांत आणि कष्टाळू मुलगा होता, असे म्हणत अनेकजण त्याच्या आठवणीने अश्रू ढाळत आहेत. शहरातील राजकीय मंडळींनीदेखील शोक व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT