Operation Sindoor
पिंपरी : शहरातून लष्कर, हवाईदल अथवा नौदलाच्या तुकड्यांची वाहने जाताना दिसली, तर कृपया त्यांचे फोटो, व्हिडीओ अथवा रील्स बनवू नका. तसेच, अनवधानाने काढलेले फोटो वा व्हिडीओ कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू नका. तुमचे हे कृत्य पाकिस्तानसारख्या शत्रुराष्ट्राला मदत करू शकते, त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड पोलिसांनीही नागरिकांना ठाम आणि स्पष्ट आवाहन केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर लष्करी दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचा भाग मानला जातो. सध्या देशभरात युद्धजन्य वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातून लष्करी हालचालींना वेग आला आहे; मात्र उत्सुकतेपोटी काही नागरिक या हालचालींचे फोटो व व्हिडईओ काढून सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
अनेकदा नागरिक देशभक्तीच्या भावनेतून किंवा केवळ आकर्षणापोटी ‘वॉव!’ म्हणत रील्स बनवतात; मात्र अशा कृतीमागचा संभाव्य धोका आणि त्याचे दुष्परिणाम समजून घेतले जात नाहीत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या पातळीवर खबरदारी घेणे, आणि इतरांनाही जागरूक करणे आवश्यक आहे. यामुळेच लष्कर आणि पोलिस प्रशासनाने नागरिकांनी सोशल मीडियावर अधिक जबाबदारीने वागावे, असे आवाहन केले आहे.
सध्याच्या डिजिटल युगात कोणतीही माहिती अवघ्या काही सेकंदात जगभर पोेचते. शत्रुराष्ट्रेही भारतीय सोशल मीडियावरील हालचालींवर बारकाईने नजर ठेवून असतात. त्यांच्या सायबर इंटेलिजन्स यंत्रणा नागरिकांनी अपलोड केलेल्या पोस्ट्स, फोटो आणि व्हिडीओ यांतून लष्करी हालचालींची, वाहतुकीची दिशा आणि धोरणांची माहिती गोळा करतात. ही माहिती उपग्रह डेटासह जोडल्यास भारतीय लष्कराची गुप्त रणनीती उघड होऊ शकते. अशा माहितीचा वापर घातपात घडवून आणण्यासाठी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जाणकार सांगतात.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणार्या दापोडीतील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (उचए), खडकीतील मिलिटरी व्हेईकल डेपो, 512 आर्मी बेस वर्कशॉप, दिघीतील संशोधन व विकास संस्था (ठ।ऊए) आणि देहूरोड येथील अॅम्युनिशन डेपो यामुळे हा परिसर लष्करासाठी अत्यंत महत्त्वाचा व संवेदनशील आहे.