लोणावळा : सर्वांशी जोडून राहण्याचा राजयोग मार्ग म्हणजे योग आहे. आपल्या पूर्वजांनी योग आत्मसात केला. योगामुळे चित्त, मन व शरीर हे शांत व एक संध राहत आहे. ज्याची जशी बुध्दी आहे तो त्या पद्धतीने वागत असतो. मात्र, योगाला आत्मसात केल्यानंतर शरीर व मनाला तसेच विचाराला एक संध राखता येऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांनी केले.(Latest Pimpri chinchwad News)
कैवल्यधाम योग संस्थेचा 101 वा स्थापना दिवस सरसंघचालक मोहन भागवत व परमपूज्य आचार्य महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोणावळा शहरामध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमात माजी मंत्री सुरेश प्रभू, कैवल्यधाम योग संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, अनुसंधान अधिकारी डॉ. रणजीत सिंग भोगल आदी उपस्थित होते. शांतीपाठ व दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या वेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, की कैवल्यधाम योग संस्था व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही संस्था समाजाला एकसंघ करण्याचे काम करत आहेत. दोन्ही संस्था वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश हा एकच आहे. भारत हा अतिप्राचीन देश आहे व योग ही त्या प्राचीनतेची ओळख आहे. भारताला विश्वगुरू बनवण्याचे कार्य या दोन्ही संस्था करत आहेत. योग करणारी व्यक्ती ही संघ शाखेला आत्मसात करते. तर, संघ शाखेमध्ये आलेले योगाला आत्मसात करत आहेत. योग व विज्ञान यामध्ये फरक असण्याचे कारण नाही, या दोन्ही गोष्टी अनुभवणे गरजेचे आहे. योगामुळे विचार संतुलित राहतात व त्यामुळेच सुदृढ समाज घडत आहे, असे मोहन भागवत यांनी सांगितले.
डॉ. सुरेश प्रभू यांनी कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी वर्षाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. स्वामी महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद महाराज म्हणाले, की शंभर वर्षांपूर्वी स्वामी कुवलयानंद यांनी योगाला जपण्याचे काम केले. पुढे ओ. पी. तिवारी व सुबोध तिवारी यांनी ही संस्था सांभाळली व वाढवली. नाव हे क्षणिक असते मात्र संस्था कायम असणार आहेत व मानवसेवा करत राहणार. चांगले झाड हवे असेल तर बीज चांगले असायला हवे. आरएसएस व कैवल्य धाम या दोन्ही संस्था मानवता व राष्ट्रासाठी काम करत आहेत. सत्ता, संपत्ती, नाव क्षणिक आहे, मात्र योगामुळे शरीर, मन व चित्त स्वस्त राहते, असे त्यांनी सांगितले.
मोहन भागवत यांनी कैवल्यधाम संस्थेच्या सांदीपनी ग्रंथालय, शास्त्रीय अनुसंधान विभाग, परमपूज्य स्वामी कुवलयानंदजी यांचे समाधीस्थळ आणि गोशाळा येथे भेटी दिल्या. तसेच, कैवल्यधाम ऐतिहासिक संग्रहालय, कैवल्य विद्या निकेतन शाळा, गोवर्धनदास सेक्सरिया योग महाविद्यालय आणि वैज्ञानिक प्रकल्प याबद्दल संक्षिप्त स्वरूपात माहिती जाणून घेतली.
कार्यक्रमादरम्यान डॉ. रितु प्रसाद लिखित सात्विक आहार आणि डॉ. शरदचंद्र भालेकर लिखित योगमय पोलिस या पुस्तकाच्या हिंदी आवृतीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच. कार्यक्रम समाप्तीनंतर मोहन भागवत यांनी स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना संबोधित केले. सूत्रसंचालन गोवर्धनदास सक्सेरिया योग महाविद्यातील विद्यार्थिनी शनया वात्सायन यांनी केले.