लेक येईल माहेरला... गौरी-गणपतीच्या सणाला Pudhari
पिंपरी चिंचवड

Gauri Aagman: लेक येईल माहेरला... गौरी-गणपतीच्या सणाला

गौराईंच्या स्वागताच्या तयारीत महिला वर्गाची लगबग सुरु

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: गणेशोत्सवात गौरीच्या रूपाने लेक माहेरी येते, अशी धारणा आहे. गौरी माहेरवाशिणी तीन दिवस येऊन राहून जातात. त्यांचे येणे आणि त्यांना सजवता सजवताच घरातली स्त्री आपली नटण्या-मुरडण्याची हौसदेखील भागवून घेते.

तिच्यासोबत सगळे घरदेखील सजते. गौराईंच्या स्वागताच्या तयारीत महिला वर्गाची लगबग सुरु आहे. गौरी ही माहेरवाशीण असते म्हणजे जशी एखादी स्त्री चार दिवस माहेरी येते आणि आपली सगळी हौस पुरवून घेते त्याचप्रमाणे गौरीदेखील तीन दिवसांची पाहुणीच असते. म्हणून तिची खाण्यापिण्याची मौज ही पंचपक्वानांच्या आणि फळफळावळांच्या रेलचेलीने भागविली जाते. (Latest Pimpri News)

गौरी आमगनाच्या तयारीत आता सगळा महिलावर्ग दंग आहे. गौराईची तीन दिवस पूजा करून पंचपक्वान्नाचा नैवद्य अर्पण केला जातो. तर सजावटीसाठी लागणारे दागिने, साडी, चोळी, साजश्रृगांराचे सामान खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. कुठे गौरीच्या मुखवट्याची खरेदी, तर कुठे जुन्याच मुखवट्यांना नवी झळाळी देण्याचे काम लगबगीने करण्यात येत आहे.

महिलांची गौरीचे मुखवडे, स्टँड, आकर्षक साड्या आणि ओवसा भरण्यासाठी सुवासिनींना लागणारे सुप खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. गौरी सजावटीसाठी लागणार्‍या साहित्यासह दागिने, ओटीचे सामान बाजारात उपलब्ध आहे. ओवशासाठी लागणारे बदाम, खारीक खोबरे यांचीही बाजरपेठ बहरली आहे. फळे व फुलांचा बाजार देखील तेजीत आहे.

गौरीच्या आरासासाठी फराळाची तयारी

गौराई सजावटीबरोबरच महिलांची स्पर्धा असते ती गौरीपुढे आरास करण्याची. यासाठी लागणार्‍या लाडू, चिवडा, करंजी, अनारसे असे फराळ तयार करण्यात महिला दंग आहेत. हल्ली हे फराळ रेडिमेडदेखील मिळत असल्याने महिलांचे काम सोपे झाले आहे. बाजारात आणि ऑनलाइन रेडिमेड फराळ आणि मोदक यांची खरेदी जोरात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT