पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग शहरातील लोकांना जे पाणी देत आहे, ते पाणी विषारी असल्याचा गंभीर आरोप सर्वसाधारण सभेत मंगळवारी (दि. 5) करण्यात आला. पवना नदीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा लॅब रिपोर्ट सभागृहात सादर केला. शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करुन त्या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावा, असा सल्ला संतप्त नगरसेवकांनी प्रशासनाला दिला.
शर्ट डॉऊनमुळे पाणी पुरवठा विस्कळीत
संगीता ताम्हाणे म्हणाल्या, की ताम्हाणेवस्ती, मोरेवस्ती भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. शाम जगताप यांनी पिंपळे गुरवमध्ये तीन महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले. सुलभा उबाळे म्हणाल्या, की दिवसाआड पाणीपुरवठा हे महापालिकेचे पाप आहे. पाणी दूषित असल्याने नागरिकांना विविध आजार जडत आहेत. महापालिकेच्या ठेवींवर कर्ज घेऊन पाण्याचे प्रकल्प पूर्ण करा. माजी उपमहापौर शैलजा मोरे म्हणाल्या, की शर्ट डॉऊन घेतल्यानंतर तीन-तीन दिवस पाणी येत नाही. दूषित पाण्यामुळे घरातील टाक्या बदल्यावा लागत आहे.
पवना जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करा
कुशाग््रा कदम म्हणाले, की कोट्यधवीचा खर्च करुनही शहराला पुरेसे पाणी का मिळत नाही. नियोजित प्रकल्पांवर किती खर्च होणार आहे. उज्ज्वला ढोरे म्हणाल्या, की सांगवीत पाणी टंचाईचा सातत्याने सामना करावा लागत आहे. पाणी कमी दाबाने येते. अधिकारी फोन उचलत नाहीत. त्यांनी मोबाईलवर महिलांच्या रोषाचा व्हिडिओ दाखवला. निखिल बोऱ्हाडे म्हणाले, की भामा आसखेड तसेच, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प तातडीने पूर्ण करा. मनिषा चिंचवडे म्हणाल्या, की पाणी नाही, वीज नाही ही आपली स्मार्ट सिटी कशी आहे. पाण्याची वेळ वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा.
40 टक्के पाणी गळती रोखा
संदीप वाघेरे म्हणाले, की पाणीपुरवठा परिचालनाच्या कामासाठी गेल्या अनेक वर्षांपासून एकच ठेकेदार असल्याने मक्तेदारी झाली आहे. पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचा खर्च 1 हजार कोटींच्या पुढे गेला आहे. तत्कालिन अधिकारी रामदास तांबे, प्रवीण लडकत यांच्यामुळे पाणीटंचाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पुणे महापालिकेप्रमाणे पाण्याचे दर करा. केंद्र व राज्याकडून कर्ज घेण्यापेक्षा महापालिकेने स्वत:च्या निधीतून प्रकल्प पूर्ण करावेत. विनोद नढे म्हणाले, की 40 टक्के गळती रोखा. आंद्रा धरणातून 100 एमएलडी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून तातडीने काम पूर्ण करा. सभेतील चर्चेदरम्यान सर्वपक्षीय नगरसेवकांनी विस्कळीत, दुषित पाणीपुरवठ्यावरुन तीव संताप व्यक्त केला. पुरसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांकडून प्रचंड तक्रारी येतात. शहराचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी पवना, आंद्रा आणि भामा आसखेड बंद जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करावे. शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी आग््राही मागणी नगरसेवकांनी केली.
पाणीपुरवठा विभाग अपयशी
स्थायी समितीच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत न बोलण्याची प्रथा पाळली जावी. भामा आसखेड प्रकल्पाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे टार्गेट दिले आहे. वाढत्या शहरासाठी पाणी कुठून आणणार? हा प्रश्न आहे. सांगवीत चार ते पाच दिवस पाणी आले नाही. सर्वच नगरसेवक त्रस्त आहेत. चोवीस तास पाणी देऊ शकत नाही. पाणीपुरवठा विभाग तसेच, सल्लागार हे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे असे प्रकार घडत आहेत. पाणी सोडणाऱ्या व्हॉल्व ऑपरेटरवर कारवाई करा, असे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले.
उधळपट्टी न करता स्वच्छ पाणी द्या
पुलावर 22 कोटी रुपयांची विद्युत रोषणाई करणे, रस्ते व उड्डाणपुलावर सुशोभीकरणावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. ही निव्वळ उधळपट्टी आहे. शुद्ध व योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी खर्च केला पाहिजे. अत्यावश्यक कामांना प्राधान्य द्यावे. नाहक उधळपट्टी करून महापालिका बदनाम करू नये, अशी टीका माजी उपमहापौर शैलजा मोरे व माजी विरोधी पक्षनेते सुलभा उबाळे यांनी केली. पाण्याच्या तक्रारी सतत ऐकून, नगरसेवक झाल्याची लाच वाटत आहे, अशी खंत मोरे यांनी व्यक्त केली.
भामा आसखेड प्रकल्पाचे सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन
पुढील आठवड्यात भामा आसखेड प्रकल्पाचे उर्वरित 30 टक्के काम सुरू होईल. दोन ठेकेदार नेमणार आहोत. ते काम सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. आंद्रा पाणी योजनेसाठी धरणाजवळ जागा मिळाली आहे. जॅकवेल व जलवाहिनीचे निविदा प्रक्रिया तयार केली आहे. पवना बंद जलवाहिनी डीपीआर तयार आहे. केंद्राच्या अर्बन चॅलेज फंडमध्ये निधीसाठी पत्र दिले आहे. कर्जासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बँका तसेच, वित्तीय संस्थांसोबत चर्चा झाली आहे. निधीअभावी कोणताही प्रकल्प मागे राहणार नाही. चासकमान धरणातून पाणी आणण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शहरात मोठ्या हाऊसिंग सोसायट्या 452 आहेत. एसटीपी नसलेल्या 62 सोसायट्यावर कारवाई सुरू आहे. शहराला सन 2041 पर्यंत 1 हजार 700 एमएलडी पाणी आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पाण्याचा पुनर्वापर केंद्राचा आराखडा तयार असून, तो पीपीपी तत्वावर सुरू करत आहोत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी
महापालिकेच्या मंगळवारी (दि. 5) झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते. सभेत शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) गटनेते विश्वजित बारणे यांनी पाण्यासंदर्भात गंभीर मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्रित पवना नदीच्या रावेत बंधारा ते मामुर्डीपर्यंत पाहणी केली. नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी खासगी लॅबकडे पाठवले. तपासणी न करण्यासाठी लॅब दबावाखाली आहेत. एका लॅबने नमुने तपासल्यानंतर शहराला पुरविले जाणारे पाणी आणि नदीतील पाण्याचे गंभीर वास्तव पुढे आले. पवना नदी मृत अवस्थेत आहे. पाणी विषारी झाले आहे. गटाराचे दूषित, विषारी पाणी शहराला दिले जात आहोत. नागरिकांना हे पाणी पिल्यामुळे कॅन्सर, डायरियासारख्या आरोग्याचे तक्रारी निर्माण झाल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. तो अहवाल त्यांनी महापौर लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिला.
पाण्याच्या टाकीचे काम संथगतीने
आरपीआयचे कुणाल वाव्हळकर म्हणाले, की ताथवडे येथे 25 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या भागात पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करून टँकर पुरवठा बंद करावा. पाणी न आल्याने महिलांनी आमच्या कार्यालयसोमर धरणे आंदोलन केले होते. सर्व अधिकारी सुटीवर होते. श्रृती वाकडकर म्हणाल्या, की शहराला स्वच्छ पाणी मिळावे म्हणून पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करावा.
नदीचे पाणी प्रक्रिया करून पुरवले जाते : आयुक्त
नगरसेवकांच्या संतापानंतर आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी खुलासा केला. ते म्हणाले, की शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न गंभीर आहे. पवना नदीतून जे पाणी आपण घेतो. ते वरच्या 27 गावांमधून नदीतून येते. अनेक ठिकाणी सांडपाणी स्वच्छ न करता थेट नदीत सोडले जाते. पाणी प्रचंड खराब आहे. त्या गावात एसटीपी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत पर्याय नसल्यामुळे ते पाणी घ्यावे लागणार आहे. पाण्याचे सर्व पॅरामीटर तपासून देत आहोत. शहराला 770 एमएलडीची गरज असताना 650 एमएलडी पाणीपुरवठा सुरू आहे. 120 एमएलडी पाणी कमी पडत आहे.